नामकरणांद्वारे महाराष्ट्र, शेतकरी हितैषीचा संदेश

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्य़ाला देशाच्या आर्थिक राजधानीशी जलदगतीने जोडण्यासाठी प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी शीघ्रसंचार द्रुतगती मार्गाच्या विरोधाची धार कमी करण्यासाठी या मार्गाचे ‘महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ असे नामकरण करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर, या मार्गावर नियोजित नवनगरांना ‘कृषी समृद्धी केंद्र’ असे गोंडस नाव देण्यात आले आहे. हा प्रकल्प केवळ नागपूर व विदर्भासाठी पुढे रेटला जात असल्याचे चित्र निर्माण होऊ नये म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने तो महाराष्ट्र व शेतकरी हितैषी असल्याचे चित्र नावांमधून रेखाटले. परंतु, या प्रकल्पात शेतकऱ्यांची केवळ नांवापुरतीच ‘समृद्धी’ असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

नागपूर-मुंबई महानगरांदरम्यान रस्ते वाहतूक सुलभ होण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने नागपूर-मुंबई समृद्धी मार्ग बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. मार्गाचा विकास आणि बांधणीसाठी भूसंपादन प्रक्रिया वेगळ्या पद्धतीने पार पाडण्यात येणार आहे. नाशिकच्या इगतपुरी व सिन्नर तालुक्यातून जाणाऱ्या या मार्गास जागा देण्यास विरोध आहे. जमीन एकत्रीकरणाची अधिसूचना प्रसिद्ध करत प्रशासनाने लगोलग मोजणीचे काम सुरू केले. त्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शवत मोजणी करणाऱ्यांना पिटाळले. नंतर पोलीस बंदोबस्तात मोजणी सुरू करत प्रशासनाने बिगर शेतकऱ्यांना विरोध करता येणार नसल्याची भूमिका घेतली. हे निर्देश म्हणजे दबावतंत्राचा प्रकार असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे.

प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेवर शेतकरी एक इंचही जमीन देणार नसल्याच्या हरकती नोंदवित असताना मोजणीची कृती कायद्याच्या दृष्टीने चुकीची असल्याचे शेतकरी किसान सभा आणि समृद्धी महामार्ग संघर्ष समितीचे अ‍ॅड. राजू देसले यांनी म्हटले आहे. नाशिकप्रमाणे ज्या जिल्’ाांतून हा मार्ग मार्गस्थ होणार आहे, तिथे यापेक्षा वेगळी स्थिती नाही.

१० जिल्’ाांतून जाणाऱ्या या महामार्गावर २४ नवनगरे स्थापन करण्यात येणार आहे. शेतकरी विरोधामुळे त्यातील कल्याण व शहापूर येथील दोन नवनगरे रद्द केली गेली असून नाशिकमधील एकाचे ठिकाण बदलले जाणार आहे. या मार्गाच्या नामकरणाचा प्रस्ताव आधीच देण्यात आला होता. विरोध वाढत असताना अलीकडेच नामकरण करण्यात आले. या निर्णयानुसार नागपूर-मुंबई समृद्धी द्रुतगती मार्गाचे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आणि त्यावर स्थापन करण्यात येणाऱ्या नवनगरांना (समृद्धी विकास केंद्र) आता ‘कृषी समृद्धी केंद्र’ या नावाने ओळखले जाईल. या नियोजित केंद्रात कृषी व कृषिपूरक औद्योगिक व वाणिज्यिक गुंतवणूक होऊन ग्रामीण विकास दरात वाढ होण्याचा शासकीय दावा शेतकरी खोडून काढतात.

ग्रामीण भागातील केंद्रात मनोरंजनपर सुविधा, नाटय़गृह उभारून काय साध्य होईल, असा प्रश्न सिन्नरच्या सोनांब्याचे शेतकरी शहाजी पवार यांनी केला. समृद्धीची निव्वळ आश्वासने दिली जातात. ग्रामीण भागात अस्तित्वातील गावांना पाणी नाही. मग, नवनगरांना पाणी कसे देता येईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रस्तावित मार्गात शिवडे गावातील सोमनाथ वाघ यांची चार एकर द्राक्ष बाग जाते. वडिलोपार्जित जमीन काबाडकष्ट करून विकसित केली. दरवर्षी द्राक्ष निर्यातीतून उत्पन्न मिळते. संपूर्ण जमीन गेल्यास कुटुंब रस्त्यावर येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नवनगरांचे कृषी समृद्धी केंद्र असे नामकरण करण्यामागे निव्वळ धूळफेकीचा डाव असल्याचे वाघ यांनी सांगितले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur mumbai express highway devendra fadnavis maharashtra samruddhi mahamarg
First published on: 30-03-2017 at 01:15 IST