नाशिक : संपूर्ण नाशिक जिल्ह्यात संततधार सुरु असताना नांदगाव नगरपरिषद आणि ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेतील प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे तसेच पाणी पुरवठा करण्याच्या ढिसाळ नियोजनामुळे नांदगाव शहराला २३ दिवस उलटूनही पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात नांदगावच्या जनतेला कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
एकीकडे धो धो पाऊस सुरु असल्याने नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज, नाग्या -साक्या धरण ओसंडून वाहू लागले आहे. नांदगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गिरणा धरणातही ७० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाल्याने वास्तविक नांदगाव शहराला पाणीटंचाईची समस्या भेडसावण्याचे कोणतेही कारण नव्हते. परंतु, अशी समस्या उदभवली आहे. केवळ योग्य नियोजन नसल्यानेच नांदगाव शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. याबाबत नांदगाव नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाला विचारणा केली असता, गिरणा धरणातील मिळणाऱ्या पाण्याचे आवर्तन वेळेवर मिळत नसल्याने पाणी वितरणाला उशीर होत असल्याचे कारण दिले जाते. जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ५६ खेडी पाणी पुरवठा योजनेचे अधिकारी मात्र त्यास नकार देत आहेत. आवर्तन वेळेवरच दिले जाते. एखाद्या वेळी काही तांत्रिक अडचण आल्यास पाण्याचे आवर्तन उशिरा दिले जाते, असे त्यांच्याकडून सांगण्यात येते. यामध्ये नांदगावचे नागरिक भरडले जात आहेत. अनेक वर्षांपासून उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूत नांदगावला २० ते २२ दिवसांनी पाणी पुरवठा होऊन कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
पावसाळ्यात तर बाहेर धो धो पाऊस कोसळत असूनही घरात पाणी पिण्यासाठी नाही, अशा परिस्थितीला नांदगावच्या नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरालाही पाणी टंचाईला कायमच तोंड द्यावे लागते. सध्या नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज आणि नाग्या-साक्या धरण तुडुंब भरले आहे. परंतु, नांदगाव शहरातील नागरिकांना या तुडुंब भरलेल्या धरणांचा कोणताही फायदा होत नसल्याचे सध्या तरी दिसत आहे.
आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून गिरणा धरण ते नांदगाव शहर पाणी पुरवठा आणि धर्मवीर आनंद दिघे ७८ खेडी पाणीपुरवठा योजना नव्याने राबविण्यात येत आहे. या योजनेचे काम प्रगतीपथावर असून लवकरच ते काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर नांदगाव शहर आणि ७८ खेड्यांना दररोज पाणीपुरवठा करण्याचे नियोजन होणार आहे. त्यामुळे या भागातील टंचाईवर कायमस्वरुपी उत्तर मिळू शकेल. त्यामुळे ही योजना लवकर पूर्ण व्हावी, अशी नांदगावकरांना अपेक्षा आहे.