नंदुरबार – येथे उभारण्यात आलेल्या पोलीस शहीद स्मारकाचे अनावरण पालकमंत्री माणिक कोकाटे यांच्या हस्ते झाले. आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार राजेश पाडवी, आमदार आमश्या पाडवी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, डॉ. अभिजित मोरे, प्रतिभा शिंदे अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री कोकाटे यांनी मार्गदर्शन करताना पोलिसांच्या कार्याचा गौरव केला.
कर्तव्य पार पाडताना अनेक पोलीस बांधवांनी मृत्युला सामोरे जात समाजाचे रक्षण केले. त्यांच्या स्मृती जागविण्यासाठी उभारलेले हे स्मारक नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिक आणि पोलीस दलासाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरेल. देशाबाहेरील सीमांचे रक्षण सैनिक करतात. तसेच देशांतर्गत सुरक्षेची जबाबदारी पोलीस दल पार पाडते. सामाजिक सुरक्षेसाठी पोलीस दल हेच विश्वासाचे प्रतीक आहे. ज्या शहिदांनी प्राणार्पण केले, त्यांची स्मारके निर्माण केलीच पाहिजेत. परंतु, जे आजही दिवस-रात्र कर्तव्य बजावत आहेत, त्यांच्यासाठीही चांगल्या सोयीसुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. नंदुरबार जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या सर्व सुविधांसाठी भरीव तरतूद केली जाईल. त्याग,आदर आणि सेवाभावाचे स्फूर्तीस्थान म्हणजेच हे पोलीस शहीद स्मारक आहे. नंदुरबार पोलीस दलाच्या प्रत्येक सदस्यासाठी हे स्मारक अभिमानाचे आणि जनतेसाठी विश्वासाचे प्रतीक ठरेल,”असा विश्वास पालकमंत्री कोकाटे यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनीही मनोगत व्यक्त केले. दहशतवाद, नक्षलवाद, दंगल, पूर, आग, अपघात, चक्रीवादळ प्रत्येक संकटात पोलीस दलाने स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचे प्राण वाचवले आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या इतिहासातही अनेक पराक्रमी अधिकारी आणि जवान होऊन गेले. हे सारे स्मारकाच्या रूपाने सदैव जिवंत राहतील. जेव्हा एखादा पोलीस अधिकारी शहीद होतो, तेव्हा त्याचे कुटुंबही त्याच्याबरोबर भावनिक, सामाजिक आणि मानसिक स्तरावर बलिदान देते. एका मुलाला वडिलांशिवाय मोठे व्हावे लागते. एका पत्नीला पतीच्या आठवणींनी आयुष्य व्यतीत करावे लागते. एका आईला दरवर्षी पोलीस स्मृतीदिनी त्या मुलाच्या नावाचे स्मारक पाहून अभिमानासह डोळ्यात अश्रू येतात. ही कुटुंबे राष्ट्राची खरी निःशब्द नायक आहेत. त्यांच्यामुळेच पोलीस दल अधिक मजबूतपणे उभे राहते, असे त्यांनी नमूद केले. पोलीस शहीद स्मारकासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ३० लाख रुपये दिल्याबद्दल पोलीस अधीक्षकांनी पालकमंत्री आणि जिल्हा नियोजन समितीचे आभार मानले
