नंदुरबार – देशात आदिवासी खात्यात सर्वाधिक भ्रष्टाचार करणारा मंत्री म्हणून डॉ. विजयकुमार गावित परिचित आहेत. त्यांनी इतके पाप करुन देखील त्यांचे काही झाले नाही. त्यामुळे आमच्यासारख्यांच्या खोट्या तक्रारी करुन आमचे काय बिघडणार, असा टोला शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नंदुरबार जिल्ह्यातील आमदार चंद्रकांत ऱघुवंशी यांनी भाजपचे आमदार तथा माजी मंत्री डाॅ. विजयकुमार गावित यांना हाणला आहे.
अक्कलकुवा येथे झालेल्या एका सभेत डॉ. गावित यांनी आमदार रघुवंशी यांना चंद्या आणि आमदार आमश्या पाडवी यांना आमशो असे संबोधित केल्याची तसेच दोघांची मस्ती जिरवायची भाषा केल्याची चित्रफीत समाज माध्यमात फिरली. त्यामुळे आमदार चंद्रकांत रघुवंशी संतप्त झाले आहेत. नंदुरबार येथे पत्रकारांशी संवाद साधताना रघुवंशी यांनी डॉ. गावित यांच्यावर टीका केली.
डाॅ. विजयकुमार गावित यांच्यासारखा पापी माणूस आमच्यावर बोलत असेल तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईलच, असे आमदार रघुवंशी यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्ही देखील स्वबळासाठी तयार असलो तरी पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील, तो आम्हाला मान्य असल्याचे चंद्रकात रघुवंशी म्हणाले.
डॉ. गावित यांना नंदुरबार जिल्ह्यात भाजपमध्येच कोणी विचारत नाही. भाजपने डॉ. गावित यांचे पंख छाटत महायुतीविषयक घडामोडींवर बोलण्यासाठी आमदार राजेश पाडवी, महामंत्री विजय चौधरी आणि जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांना प्राधिकृत केले असल्याचा दावा करत डॉ. गावित यांना भाजपमध्ये कवडीचीही किंमत नसल्याची टीका चंद्रकांत रघुवंशी यांनी केली.
ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरु झाली असताना नंदुरबार जिल्ह्यात महायुतीमधील भाजपचे आमदार डॉ. विजयकुमार गावित, शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमदार आमश्या पाडवी यांच्यातील वाद विकोपाला गेले आहेत. भाजपचे माजी मंत्री तथा आमदार डाॅ. विजयकुमार गावित आणि शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यातील वाद नवा नाही. वर्षानुवर्षे एकमेकांविरोधात जहरी टीका करणारे हे दोन्ही नेते आता जिल्हा परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आपण महायुतीत असल्याचे विसरुन एकमेकांवर चिखलफेक करत आहेत.