नंदुरबार – फलकबाजीच्या वादातून झालेल्या मारहाणीत नंदुरबारमध्ये एका युवकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणानंतर नंदुरबारमध्ये राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

नंदुरबार शहरातील सिद्धीविनायक चौकात चार ऑगस्ट रोजी फलक लावण्याच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली होती. हा वाद पोलीस ठाण्यात पोहचल्यानंतर दोन्ही गटांनी गुन्हा दाखल करण्याच टाळले. परंतु, यातील जखमी मोहित मदन राजपूत या युवकाला हिमोफिलिया आजार असल्याने चार दिवसानंतर त्यास त्रास होऊ लागल्याने त्याला सुरत येथे हलविण्यात आले होते. सुरत येथे त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. परंतु, त्यांनतर तो कोमात गेला होता. नंतर त्याचा मृत्यू झाला.

मोहित राजपूत हा कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ता असल्याने त्याच्या मृत्युनंतर या घटनेचे पडसाद शहरात उमटतांना दिसून आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी तीनशेहून अधिक कार्यकर्ते शहर पोलीस ठाण्यात जमा झाले होते. या प्रकरणी मयत मोहितच्या चुलत भावाच्या तक्रारीवरुन पाच जणांविरुध्द हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. यातील दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली.

मोहितचे पार्थिव सुरतहून मंगळवारी रात्री उशीरा नंदुरबारमध्ये आले. यावेळी त्याच्या घराजवळ मोठा फौजफाटा जमा झाला होता. मोहितच्या मृत्युला काही राजकीय नेते जबाबदार असल्याचा आरोप देखील यावेळी उपस्थितांनी यावेळी केला. तक्रारीनुसार, आपण गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी नमूद करत तपासात यात नेमका कोणाचा हात होता, हे स्पष्ट झाल्यास त्यानुसार कारवाई होईलच, अशी भूमिका घेतली. यानंतर रात्री शहरातील स्मशानभूमीत अंतिमसंस्कार करण्यात आले. मात्र याआधी शहरात मोहितला श्रद्धांजलीपर फलक लावण्यात आले. मुळातच दोन ते तीन वर्षाआधीच मोहितच्या भावाचा अशाच प्रकारच्या आजाराने मृत्यू झाला होता.

मोहितच्या कुटुंबियांची हातगाडी असून त्यावरुन नाश्ता विक्रीचा त्यांचा व्यवसाय आहे. या कुटुंबातील दोन्ही मुलांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणात सखोल चौकशी होऊन जर कोणी दोषी आढळल्यास कडक कारवाईची गरज व्यक्त होतांना दिसत आहे. शहरातील सिद्धीविनायक चौकासह सर्वत्र सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबारसह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न होत आहेत. त्यात अशा एखाद्या प्रकरणाची भर पडल्यास पोलिसांना काळजीपूर्वक हालचाली कराव्या लागत आहेत. राजकीय पक्षांच्या आरोप-प्रत्यारोपांना आता निवडणुकीमुळे अधिकच धार चढण्याची शक्यता असल्याने कार्यकर्त्यांमध्ये वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.