नाशिक – सुवर्ण त्रिकोणातील एक कोन आणि कुंभनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या आर्थिक विकासाची जबरदस्त क्षमता नव्याने अधोरेखीत झाली आहे. नाशिक विमानतळाच्या इतिहासात एकाच दिवशी तब्बल १६२३ प्रवाशांनी प्रवास करीत नव्या विक्रमाची नोंद केली. सात जून रोजी या विमानतळावरून एकाच दिवशी १३३४ प्रवाशांनी प्रवास केला होता. तो विक्रम मोडीत निघाला.

राज्यात सर्वाधिक प्रवाशांची नोंद मुंबई, पुणे, नागपूर विमानतळावर होते. रविवारी म्हणजे २६ ऑक्टोबर रोजी नाशिकही त्या पंक्तीत जाऊन बसण्याच्या मार्गावर असल्याचे अधोरेखीत झाले. याच दिवशी नाशिक ते दिल्ली दरम्यान रात्रीची विमानसेवा सुरू झाली. म्हणजे दिल्लीला ये-जा करण्यासाठी सकाळी आणि रात्रीही विमानसेवा उपलब्ध झाली आहे. नाशिक विमानतळाचे २०१४ मध्ये उद्घाटन झाले होते.परंतु, त्याला पूर्ण क्षमतेने हवाई नकाशावर येण्यास सात ते आठ वर्ष प्रतिक्षा करावी लागली. या कालावधीत काही शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू झाली. परंतु, वेगवेगळ्या कारणांनी ती बंद पडली. उडान योजनेंत नाशिक विमानतळावरून विमान सेवा सुरू झाली. २०२१ पासून विमानतळावरील सेवा प्रभावीपणे कार्यान्वित झाली. सध्या दैनंदिन सहा आणि एक दिवसाआड आठ विमानांचे उड्डाण होत आहे.

रविवारी नाशिक विमानतळावरून सहा उड्डाणे झाली. त्यात नवी दिल्लीसाठी दोन, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, गोवा या शहरांचा समावेश होता. या दिवशी उपरोक्त शहरांतून विमानाने ८३० प्रवासी नाशिक विमानतळावर आले तर, ७९३ प्रवासी त्या शहरांकडे या विमानतळावरून मार्गस्थ झाले. अशा प्रकारे एकूण १६२३ इतकी आजवरची सर्वाधिक प्रवासी संख्या गाठली गेल्याचे निमाचे् उपाध्यक्ष मनिष रावत यांनी सांगितले. यापूर्वी सात जून २०२५ रोजी १३३४ ही सर्वाधिक प्रवासी संख्या गाठली होती. तो विक्रम मोडीत निघाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. नाशिक विमानतळावरील प्रवाशांचा वाढता प्रतिसाद आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेता अधिकाधिक प्रवाशांना सोयी सुविधा पुरविणाऱ्या अत्याधुनिक टर्मिनलची गरज हवाई वाहतूक क्षेत्रातील जाणकार डॉ. राहुल बोराडे यांनी मांडली. नाशिक ते दिल्ली दरम्यानची रात्रीची विमानसेवा सुरू झाली. पहिल्या दिवशी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी या नव्या विमानसेवेतून दिल्लीकडे प्रस्थान केले.

मध्यंतरीच्या काळात काही ठिकाणची विमान सेवा कमी झाली होती. तेव्हा नाशिक विमानतळावरील प्रवासी संख्या प्रतिदिन ८०० ते एक हजारच्या दरम्यान आली होती. रविवारी नाशिक विमानतळाच्या इतिहासात सर्वाधिक १६२३ प्रवासी संख्येची नोंद झाली. नाशिकची प्रचंड क्षमता असल्याने दिल्लीसाठी दुसऱ्या विमान सेवेची मागणी केली जात होती. हवाईमार्गे नाशिक वेगवेगळ्या शहरांना जोडले जात असल्याने विविध क्षेत्रांच्या विकासाला चालना मिळेल. नाशिकमध्ये नवीन गुंतवणूक येईल. पर्यटनाला चालना मिळणार आहे. कुंभमेळ्यासाठी नवीन टर्मिनल इमारतीबरोबर देशभरातील प्रमुख शहरांमधून नाशिकला विमानसेवा उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे. – मनिष रावत (उपाध्यक्ष, निमा)