नाशिक – हातात कोयते, तलवारी घेत सात ते आठ जणांनी अंबड परिसरातील आझाद नगरात गुरूवारी रात्री धुडगुस घातला. टोळक्याच्या हातातील शस्त्रे पाहून नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. समाजकंटकांनी परिसरातील वाहनांची तोडफोड, नासधुस केली. संशयितांविरुध्द या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक पोलिसांच्या वतीने गुन्हेगारांच्या याद्या अद्यावत करुन तडीपार, मकोका यासह वेगवेगळ्या मोहिमांच्या माध्यमातून अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पोलीस दलाची प्रतिमा बदलण्यासाठी अंतर्गत खांदेपालटही करण्यात आली. आजही पोलीस रस्त्यावर उतरत असल्याचा दावा करण्यात येत असला तरी गुंडांकडून कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणे सुरुच आहे. अंबड परिसरातील आझादनगर खाडी परिसरात गुरूवारी रात्री संशयित गैसोद्दीन शेख (रा. संजीवनगर) आणि त्याच्या पाच ते सात साथीदारांनी दुचाकीवरून येत तक्रारदार अमीन खान यांच्या घरासमोरील चारचाकी, दुचाकी वाहनांची कोयते व दांडक्याच्या सहाय्याने तोडफोड केली.
दरवाजा आणि खिडक्यांवर कोयते, तलवारीच्या सहाय्याने वार करुन नुकसान करण्यात आले. अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ हा गोंधळ सुरू होता. काही रहिवाशांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही शस्त्राचा धाक दाखवून शिवीगाळ करण्यात आली. धुडगूस घातल्यानंतर संशयितांनी दुचाकीवरून पलायन केले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणी अंबड पोलिसांनी चार विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतल्याची माहिती अंबड वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.
विधीसंघर्षित बालकांचा मुद्दा पुन्हा चर्चेत
नाशिक शहराचा गुन्हेगारीचा आलेख उंचावत असतांना यामध्ये घरफोडी, लुटमार, सोनसाखळी चोरी, दंगल यासह वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये सराईत गुन्हेगारांसह विधीसंघर्षित बालकांचा सहभाग वाढत आहे. या बालकांचे आदर्श हे गल्लीतील गावगुंड आहेत. पोलीस दलासह अन्य आस्थापनांकडून त्यांचे प्रबोधन तसेच पुनवर्सनासाठी प्रयत्न होत असले तरी या बालकांना गुन्हेगारी विश्वाची पडलेली भुरळ सामान्यांसह पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे.
गंभीर बाब म्हणजे विधीसंघर्षितांकडून होणारा धारदार शस्त्राचा वापर. नशेचे सामान संबंधितापर्यंत कसे पोहचते, याचा नाशिक पोलीस शोध घेत आहेत. पालकांनीही आपला मुलगा, मुलगी नेमके काय करीत आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे.