नाशिक : एखाद्या चित्रपटाला साजेशा पद्धतीने टोळक्याने मेळा बस स्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये कांदा व्यापाऱ्यास लुटले. धक्काबुक्की करुन व्यापाऱ्याच्या ताब्यातील ११ लाख ६६ हजार रुपये असणारी पिशवी हिसकावून नेली. यावेळी व्यापाऱ्याने आरडाओरड केल्यामुळे एक परप्रांतीय चोरटा हाती लागला. त्याचे तीन साथीदार रोकड घेऊन पसार झाले.

काही महिन्यांपासून शहरातील बस स्थानकांमध्ये महिलांचे दागिने चोरीचे प्रकार घडत आहेत. गर्दीचा फायदा घेऊन चोरटे महिलांचे दागिने लंपास करत असल्याचे दाखल गुन्ह्यांवरून दिसून येते. या घटनाक्रमात टोळक्याकडून थेट लुटीची भर पडली. याबाबत विष्णू पाचोरे (शिवाजीनगर, सिन्नर) यांनी तक्रार दिली. प्रवाशांच्या मदतीने अन्वर मनियार (४८, कुआ, बुलंद, उत्तर प्रदेश) या संशयित चोरट्यास पकडण्यात आले. पाचोरे हे कांदा व्यापारी आहेत. मंगळवारी ते मालेगाव तालुक्यातील उमराणे येथे कांदा खरेदीसाठी निघाले होते. सकाळी मेळा बस स्थानकात आले. साडे सातच्या सुमारास नाशिक-धुळे बसमध्ये बसले. त्यांच्या बॅगेत सुमारे ११ लाख ६६ हजार ३०० रुपये असलेली पिशवी होती.

हेही वाचा…नाशिकमध्ये सराईत गुन्हेगाराची हत्या, तीन जण ताब्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बसमध्ये चढलेले चार ते पाच जण त्यांच्याजवळ घुटमळू लागले. प्रसंगावधान राखत त्यांनी वर ठेवलेली बॅग खाली काढण्याचा प्रयत्न केला असता एकाने बॅग उघडून पैशांनी भरलेली पिशवी बळजबरीने हिसकावली. पाचोरे यांनी आरडाओरड केल्याने बसमध्ये चढणाऱ्या आणि स्थानकातील इतरांनी धाव घेत चोरट्यांपैकी एकाला पकडून चोप दिला. नंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी तीन संशयित पैशांची पिशवी घेऊन पसार झाले. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.