जळगाव : एका वर्षासाठी संधी मिळाली असताना दोन वर्ष उलटले तरी राजीनामा न देणाऱ्या बाजार समितीच्या सभापतींविरोधात १४ संचालकांनी नुकताच अविश्वास आणला होता. त्यानंतर महायुतीचे बहुतांश संचालक सहलीवर रवाना देखील झाले होते. प्रत्यक्षात, सभापतीपद आपल्याकडे खेचून शिवसेनेने (उद्धव ठाकरे) महायुतीला शुक्रवारी जोरदार धक्का दिला. महायुतीला उपसभापतीपदावर समाधान मानावे लागले.
जिल्ह्यातील सर्वात मोठ्या जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) पॅनेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) तत्कालिन नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे पॅनेल एकमेकांसमोर उभे ठाकले होते. अत्यंत चुरशीच्या त्या निवडणुकीत महाविकास आघाडीने १८ जागांपैकी ११ जागा जिंकून शिवसेना शिंदे गटाला चांगलीच धुळ चारली होती. त्या निकालाने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना वैयक्तिक मोठा धक्का बसला होता. तेव्हापासून बाजार समितीवर माजी मंत्री देवकर यांच्या मर्जीतील श्यामकांत सोनवणे हेच सभापती म्हणून कार्यरत होते. दरम्यान, ठरल्याप्रमाणे सभापतीपद सोडले नाही म्हणून १४ संचालकांनी सोनवणे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला. त्यानंतर नामुष्की टाळण्यासाठी सभापतींनी दोन दिवस आधीच आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. उपसभापतींनी त्याआधीच राजीनामा दिलेला होता.
त्यामुळे शुक्रवारी बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदासाठी निवडणूक पार पडली. पैकी सभापतीपदासाठी ठाकरे गटाचे सुनील महाजन तसेच मनोज चौधरी आणि लक्ष्मण पाटील यांनी अर्ज घेतले होते. तर उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीचे (अजित पवार) गोकुळ चव्हाण यांचा एकमेव अर्ज होता. त्यामुळे चव्हाण यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. मात्र, मनोज चौधरी यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर सभापतीपदासाठी महाजन आणि पाटील यांच्यात थेट लढत रंगली. यावेळी हात उंचावून मतदान घेण्यात आले असता, महाजन यांना १५ आणि लक्ष्मण पाटील यांना अवघी दोनच मते मिळाली. परिणामी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी महाजन यांना सभापती घोषित केले.
बहुमत असतानाही महायुतीला सक्षम उमेदवार देऊन बाजार समितीची सत्ता ताब्यात घेता आली नाही. याउलट महायुतीच्याच संचालकांच्या पाठिंब्यावर ठाकरे गटाचे महाजन सभापती बनले. सभापती महाजन हे जळगाव महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते आणि माजी महापौर जयश्री महाजन यांचे पती आहेत. सभापती-उपसभापती निवडीनंतर बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांसह समर्थकांनी गुलाल उधळत ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला.
सभापती निवडणुकीनंतर सुनील महाजन यांनी बाजार समितीच्या माध्यमातून वसुली वाढवून शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याची ग्वाही दिली. तसेच माजी मंत्री सुरेश जैन यांचा एक कार्यकर्ता आज बाजार समितीचा सभापती झाल्याचा आनंद असल्याचे सांगितले. जैन यांची तब्बल ४० वर्षे जळगाव बाजार समितीवर एक हाती सत्ता होती, अशीही आठवण महाजन यांनी यावेळी काढली. दरम्यान, सभापती महाजन यांनी सहकारात कोणतेही राजकारण राहत नाही. हे पॅनेल मूळात सर्वपक्षीय होते, असा दावा केला. विशेष म्हणजे जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांचे त्यांनी आभार मानले.