नाशिक – सुमारे ४१ दिवसांपासून आश्रमशाळा कंत्राटी कर्मचारी तृतीय वर्ग व चतुर्थ वर्ग संघटनेचे येथे आदिवासी विकास भवनाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन चालू असून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी समविचारी संघटनांच्या सहकार्याने आयोजित बैठकीत २५ ऑगस्ट रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शासनाने आश्रमशाळांमध्ये बाह्यस्त्रोताद्वारे नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी ४१ दिवसांपासून आदिवासी भवनाच्या प्रवेशद्वारासमोर कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चालू आहे. काही लोकप्रतिनिधींनी आंदोलकांची भेट घेतली असली तरी या प्रश्नावर अद्याप तोडगा निघालेला नाही. आंदोलकांनी आदिवासी विकास भवन परिसरात शिरण्याचा प्रयत्न केला असता पोलीस तसेच आदिवासी आयुक्तालयाच्या वतीने त्यांना विरोध करण्यात आला.

शासन, प्रशासनाकडून आंदोलनाची कोणतीच दखल घेण्यात येत नसल्याबद्दल रविवारी समविचारी आदिवासी संघटनांनी एकत्र येत बैठक घेतली. बैठकीत २५ ऑगस्ट रोजी तपोवन परिसरातून आदिवासी भवनापर्यंत मोर्चा काढण्याचे ठरविण्यात आले. या मोर्चात राज्याच्या कानाकोपऱ्यातून आदिवासी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना सहभागी होणार आहेत. हा मोर्चा तपोवन परिसरातून अशोकस्तंभ-सीबीएसमार्गे आदिवासी भवनावर धडकणार आहे.

याविषयी उलगुलान संघटनेचे प्रभाकर पारसे यांनी माहिती दिली. सहा महिन्यांहून अधिक काळापासून शिक्षकांचे वेतन झालेले नाही. मुलांचे शिक्षण थांबलेले आहे. आंदोलनाच्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था नाही. आंदोलक काही पैसे गोळा करत एक वेळच्या जेवणाची व्यवस्था करत आहेत. आंदोलकांचे पगार न झाल्याने त्यांच्या कुटूंबियांनाही दोन वेळच्या जेवणासाठी धडपड करावी लागत असल्याचे पारसे यांनी सांगितले.

नाशिक, कळवणसह जिल्ह्यात ३६ आश्रमशाळा आहेत. या आश्रमशाळांमध्ये हजारोंहून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. जूनपासून आंदोलनामुळे शिक्षक कामावर रुजू नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारे शिकविण्यात आलेले नाही, अध्ययन झालेले नसताना आदिवासी विभागाकडून पहिली घटक चाचणी घेण्यात येत आहे. शिकवलेच नाही तर विद्यार्थी परीक्षा कशी देणार, असा प्रश्न पारसे यांनी केला आहे. शिक्षकांसह विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने आता आरपारची लढाई होत असल्याचे पारसे यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांची भेट

बाह्यस्त्रोत नियुक्ती रद्द करण्यासह इतर मागण्यांविषयी आंदोलकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे येथील निवासस्थानी भेट घेतली. आंदोलकांनी आपली व्यथा मांडली. मागण्यांचे निवेदन दिले. याबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी लवकरच चर्चा करुन या विषयावर तोडगा काढू, असे आश्वासन दिले. आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांच्याशी संपर्क करत आंदोलक ऊन, पावसात प्रवेशव्दारासमोर असल्याने त्यांना आदिवासी भवन परिसरात येऊ द्यावे, अशी सूचना केली. मात्र आंदोलक बाहेरच बसण्यावर ठाम आहेत.