स्टार एअरने नाशिक-बेळगाव विमानसेवेसाठी प्रवाशांची नोंदणी पुन्हा सुरू केली असून तीन फेब्रुवारीपासून नाशिक-बेळगाव विमानसेवा पूर्ववत होणार आहे. आठवड्यातून दोन दिवस ही सेवा उपलब्ध राहणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>पदवीधर मतदार नोंदणीत पुरूषांची आघाडी; प्रारुप यादीत एक लाख ५५ हजारहून अधिक मतदार

उडान योजनेचा तीन वर्षाचा कालावधी संपुष्टात आल्यामुळे तसेच व्यावसायिक उड्डाणास प्रतिसादाअभावी एक नोव्हेंबरपासून एलायन्स एअरलाईनने नाशिक-पुणे आणि हैद्राबाद-नाशिक-अहमदाबाद-दिल्ली आणि स्टार एअरने नाशिक-बेळगाव विमान सेवा बंद केली होती. माजीमंत्री छगन भुजबळ यांनी उडान योजनेंतर्गत विमानसेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी केल्यानंतर केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या निर्देशानुसार स्टार एअरने बेळगाव-नाशिक-बेळगाव विमान सेवेसाठी नोंदणी पुन्हा सुरू केली असल्याची माहिती उद्योजक मनीष रावल यांनी दिली. तीन फेब्रुवारीपासून स्टार एअरलाइन प्रत्येक शुक्रवार आणि रविवारी नाशिक-बेळगाव विमानसेवा सुरू करणार आहे. त्यासाठी कंपनीने नोंदणी देखील सुरू केली आहे. तसेच दुसऱ्या कंपन्यांच्या विमानसेवाही सुरू करण्यासाठी भुजबळ यांच्याकडून प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा >>>नाशिक: प्रभाग रचना बदलाचा सोस, पण मार्गदर्शक सूचनांचा अभाव; महापालिका यंत्रणाही संभ्रमात

वेळापत्रक कसे ?
आठवड्यातून दोन दिवस या विमान सेवेचा लाभ मिळणार आहे. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता बेळगावहून विमान निघून नाशिक येथे १०.३० वाजता पोहचेल. नाशिकहून सकाळी पावणेअकरा वाजता निघणारे विमान तासाभरात बेळगावला पोहचेल. रविवारी सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी बेळगावहून निघणारे विमान सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी नाशिकला पोहोचेल. सायंकाळी साडेसहा वाजता नाशिकहून बेळगावकडे निघालेले विमान साडेसात वाजता तिकडे पोहोचणार आहे. या मार्गावर ५० सीटर एम्ब्रेअर १४५ विमान धावणार आहे.

हेही वाचा >>>नाशिक: आधारतीर्थ आश्रमातील मुलांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह; बालकाच्या मृत्यूनंतर पोलिसांकडून चौकशीसत्र

राजकीय पातळीवर संघर्ष
उडान योजनेतील काही विमान सेवा बंद झाल्यानंतर राजकीय पातळीवर गदारोळ उडाला होता. नाशिकहून सेवा देणारी विमाने राजकीय दबावातून अन्य राज्यात पळवून नेल्याची टीका झाली होती. हे आक्षेप केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी तथ्यहीन ठरवले होते. उडान सेवेला मुदतवाढ देण्यासाठी पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी म्हटले होते. नाशिक-बेळगाव विमान सेवा सुरू होत असल्याने आपल्या प्रयत्नांना यश आल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे. बंद झालेली एक विमान सेवा पूर्ववत होत असल्याने त्याचे श्रेय घेण्यावरून राजकीय पातळीवर संघर्ष अटळ असल्याचे चित्र आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik belgaum flight service resumed amy
First published on: 24-11-2022 at 14:54 IST