नाशिक : गणरायाचे आगमन अवघ्या काही तासांवर आले असतांना गणरायाच्या स्वागतासाठी गणेश भक्तांसह सार्वजनिक गणेश मंडळे सज्ज झाली आहेत. मुंबई-पुण्या पाठोपाठ नाशिकची आगमन-विसर्जन मिरवणुकही लक्षवेधी होत आहे. यंदा या मिरवणुकांवर चिमुकल्यांकडून सादर होणाऱ्या शिवकालीन मर्दानी खेळांचा प्रभाव असणार आहे. विशेष म्हणजे, यामध्ये महिलांचाही समावेश आहे. शिवकालीन खेळांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेली चिमुकल्यांची पथके अनेक मिरवणुकांमध्ये सहभागी होऊ लागली आहेत. काठी, बाणा, दांडपट्टा, विटा, चक्र आदींची प्रात्यक्षिके शिवकालीन संस्कृतीची अनुभूती देत आहे.

मागील काही वर्षात गणेशोत्सवात ढोल-ताशांचा गजर, लेझीम पथक, भगवा फडकवत पारंपरिक पद्धतीने मार्गक्रमण करणारी मिरवणूक लक्ष वेधत आहे. काही मंडळांच्या मिरवणुकीत लाठी-काठी आणि तलवारी फिरवत, युवक-युवती खेळ सादर करताना दिसत असे. यातून हिंदु संस्कृती, शिवकालीन पराक्रम, मराठ्यांचा इतिहास आणि धैर्याची परंपरा अधोरेखीत करण्याचा प्रयत्न होतो. कर्णकर्कश आवाजाच्या भिंतीमधून गाण्यांवर अंगविक्षिप्त नाचण्यापेक्षा पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात मिरवणुकीत लाठी-काठीचे शिवकालीन मर्दानी खेळ गणेशभक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. आतापर्यंत नाशिकमध्ये असे खेळ सादर करणाऱ्या पथकांची संख्या मर्यादित होती. या वर्षी त्यांची संख्या चांगलीच वाढली. ती विस्तारण्यात राष्ट्रीय मर्दानी युध्दकला गुरूकुल संस्था हातभार लावत आहे.

मिरवणुकीत शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेल्या पथकांकडून मर्दानी खेळाचे सादरीकरण लक्षवेधी ठरते. गुरूकुल संस्थेत वर्षभर हे सराव सुरू असतात. गणेशोत्सवासाठी तीन महिने आधी विशेष सरावाला सुरूवात होते. संस्थेत पाच वर्षापासून ६० वर्षापर्यंत चिमुकले, महिला, पुरूष प्रशिक्षण घेतात. विशेष म्हणजे यामध्ये महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे गुरूकुलचे परिश्रृत क्षीरसागर यांनी सांगितले. शिवकालीन खेळांच्या प्रशिक्षणासाठी संस्थेचा तीन महिन्यांचा अभ्यासक्रम आहे. यामध्ये शस्त्राचा वापर कसा आणि का करावा, शस्त्र केवळ हिंसेसाठी नाही तर, मानसिक व शारिरीक चपळाईसाठी कसे उपयुक्त होऊ शकतात, यासह विविध मर्दानी खेळाची माहिती देत त्यांची प्रात्यक्षिकांचा सराव केला जातो.

लोप पावत चाललेली शिवकालीन युध्दकला, मर्दानी खेळ यांची माहिती आजच्या पिढीपर्यंत पोहचावी, या उद्देशाने २०२२ पासून संस्था प्रयत्नरत आहे. जागतिक पातळीवर आपले मर्दानी खेळ पोहोचण्यात कमी पडतात. राज्याचा विचार केला तर सातारा, कोल्हापूर वगळता इतरत्र असे खेळ कुठे खेळले.शिकवले जात नाहीत. हे लक्षात घेऊन संस्था काम करत आहे. गणेशोत्सव मिरवणूक निमित्त आहे, मात्र या अभ्यासक्रमातुन एक हात काठी, दोन हाती काठी, बाणा, दांडपट्टा , विटा, चक्र आदींचे प्रात्यक्षिक दाखवले जाते. त्याचे खेळ करून घेतले जातात. संस्थेत सध्या २०० हून अधिक लहान मुले व मोठी मंडळीही अभ्यासक्रमाचे शिक्षण प्रशिक्षण घेत आहे. यंदा मिरवणुकीत हे विद्यार्थी सर्वांना स्तिमित करतील तसेच शिकण्यापलीकडे संस्कृतीचा हा अमूल्य वारसा पुढे नेतील, असा विश्वास परिश्रृृत क्षीरसागर यांनी व्यक्त केला.