नाशिक : अनेक वर्षांपासून नाशिक शहरातील सातपूर, अंबड, सिंडको परिसरात दहशत माजविणाऱ्या आणि नागरिकांची लूट करणाऱ्या पीएल ग्रुप अर्थात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पदाधिकारी आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढे टोळीची तीनमजली अनधिकृत इमारत महानगरपालिकेने नाशिक पोलिसांच्या सहकार्याने जमीनदोस्त केली.
नाशिक पोलिसांनी गुन्हेगारी निर्मूलनार्थ सुरु केलेल्या मोहिमेनंतर जाग आलेल्या महापालिका प्रशासनानेही यानिमित्ताने अनधिकृत बांधकामे, अनधिकृत फलकबाजी यांविरोधात हातपाय हलविण्यास सुरुवात केली आहे. परंतु, यानिमित्ताने नाशिकमधील नागरिकांच्या मनात काही प्रश्न उभे राहिले आहेत.
प्रकाश लोंढे अर्थात पीएल ग्रुपची आयटीआय सिग्नल-खुटवडनगर मार्गावर नंदिनी नदीलगत तीनमजली इमारत होती. इमारतीचे बांधकाम सुरु होऊन इमारत पूर्ण होऊन तिचा वापर अवैध कामांसाठी लोंढे टोळीकडून करण्यात येत असतानाही नाशिक महापालिका प्रशासन यापासून पूर्णपणे अनभिज्ञ होते. नाशिक शहरात एका गुन्हेगारी टोळीकडून अशी भव्य इमारत अवैधरित्या उभी करण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाच्या ध्यानीमनीही नव्हते.
एरवी, शहरातील किरकोळ अनधिकृत काम आढळल्यास सर्वसामान्य नागरिकांपाठी नोटिसीचा तगादा महापालिका प्रशासनाकडून लावला जातो. असे असताना नंदिनी नदीलगत अवैधपणे तीनमजली भव्य इमारत उभी राहत असताना महापालिका प्रशासन झोपले होते काय, याआधी महापालिका आयुक्त, अधिकाऱ्यांना या अवैध बांधकामासंदर्भात माहिती असूनही गुंडांच्या धाकाने अथवा काही अर्थपूर्ण व्यवहारामुळे या अवैध बांधकामावर कारवाई करणे टाळले गेले काय, अधिकाऱ्यांवर कोणाचा दबाव होता काय, असे प्रश्न नाशिककरांच्या मनात उभे राहिले आहेत.
नाशिक शहरात राजकीय पक्षांशी संबंधित इतरही अनेक गुन्हेगारांची अशी अनधिकृत बांधकामे असण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरुध्द महापालिका प्रशासन कधी कारवाई करणार, पोलिसांकडून सूचना येण्याची महापालिका प्रशासन वाट पाहणार काय, या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. खरेतर नाशिक महापालिका प्रशासनाने राजकीय पक्षांशी संबंधित मंडळींची अनधिकृत बांधकामे असतील तर त्यांची यादीच सार्वजनिकरित्या जाहीर केली पाहिजे. पोलिसांनी गुन्हेगारीमुक्त नाशिकच्या दिशेने पाऊल टाकले असताना या संधीचा फायदा घेत महापालिकेनेही राजकीय मंडळींना हिसका दाखविण्याची हीच वेळ आहे. केवळ एका पीएल ग्रुपच्या अवैध बांधकामावर कारवाई करुन ही मोहीम महापालिकेने थांबवू नये.
अर्थात, यााधी काहीही न करणाऱ्या नाशिक महापालिका प्रशासनाने लोकलज्जास्तव का होईना, लोंढे टोळीची अनधिकृत इमारत उदध्वस्त केल्याचेही नागरिकांना समाधान आहे. गुरुवारी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या उपस्थितीत पथकाने इमारत जमीनदोस्त केली. अनुचित प्रकार घडू नये म्हणून यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मुख्य मार्गावरील एका बाजुची वाहतूक बंद करून ती दुसऱ्या बाजुने वळवण्यात आले. इमारतीलगतची घरे आधीच रिकामी करण्यात आली होती. लोंढेशी संबंधित ही इमारत निळ्या पूररेषेत बांधलेली होती. या संदर्भात महापालिकेने कागदपत्रे सादर करण्याची नोटीस बजावली. विहित मुदतीत लोंढे वा त्यांच्यावतीने कुणीही कागदपत्रे सादर करण्यास पुढे आले नाही. नोटीसचा कालावधी संपल्यानंतर इमारत पाडकामाला सुरुवात झाली. यावेळी बघ्यांची गर्दी झाली होती. या गर्दीतील प्रत्येकाच्या तोंडी एकच प्रश्न होता. इतके दिवस महापालिका झोपली होती काय ?