नाशिक – शहरातील रस्ते, चौक, सिग्नल, दुभाजक, वाहतूक बेट इतकेच काय, दिशादर्शक कमानीही. जिथे जागा मिळेल तिथे अवैधपणे फलकबाजी होत असताना आणि सर्वसामान्य नाशिककर दररोज महापालिकेच्या नजरेला यामागील धोका लक्षात आणून देत असताना गांधारीप्रमाणे डोळ्यांवर पट्टी बांधलेले महापालिका प्रशासन ढिम्मच राहिले आहे. याचा परिणाम जो व्हायचा तोच झाला. बुधवारी पंचवटीतील मखमलाबाद रस्त्यावरील सिग्नलवर लावलेली कमान कोसळली.
केवळ महापालिका आणि अवैधपणे कमान लावणाऱ्या संबंधित भाजपच्या माजी नगरसेवकाचे नशिब बलवत्तर म्हणून जीवितहानी झाली नाही. सर्वसामान्य नाशिककरांना जे दिसते, ते महापालिका प्रशासनाला दिसत नाही का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
पंचवटीतील मखमलाबाद रस्त्यावरील ड्रीम कॅसल इमारतीजवळील सिग्नलवर नवरात्रोत्सवानिमित्त शुभेच्छा फलकाची कमान भाजपच्या माजी नगरसेवकाने लावली होती. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, अशा शुभेच्छा फलकांचे सर्वत्र पेव फुटले आहे. त्यासाठी महापालिकेचे सर्व नियम पायदळी तुडविले जात आहेत. बुधवारी शुभेच्छा फलकाची कमान कोसळली. त्यावेळी सिग्नल सुटलेला असल्याने त्याजागी फारशी वाहने नव्हती. अन्यथा, जीवितहानीचा धोका होता. महापालिका प्रशासनाने याप्रकरणी संबंधिताविरुध्द कारवाई करण्याचा इशारा दिला असला तरी ही वेळ येईपर्यंत प्रशासन झोपलेले होते काय, असा प्रश्न आहे.
तीर्थक्षेत्र अशी नाशिक शहराची ओळख असल्याने बाहेरील राज्यांमधून येणाऱ्या भाविक, पर्यटकांची संख्याही अधिक आहे. बाहेरील राज्यांमधून येणाऱ्यांसाठी शहरातील रस्त्यांवर, चौकांमध्ये उभारण्यात आलेल्या दिशादर्शक कमानींमुळे मार्गदर्शन होते. परंतु, या दिशादर्शक कमानी म्हणजे जाहिरात कमानी झाल्या आहेत. गल्लीतील कोणत्याही चिरमूड कार्यकर्त्याचा वाढदिवस असो किंवा एखादा कार्यक्रम असो. या दिशादर्शक कमानी शुभेच्छा फलकांनी झाकल्या जातात. विशेषत: सत्ताधारी आमदारांनी याबाबतीत विशेष दक्ष राहण्याची गरज आहे.
आपल्या कोणत्याही कार्यकर्त्याने, पदाधिकाऱ्याने अशी जाहिरातबाजी करु नये, असे त्यांचे सक्त आदेशच हवेत. परंतु, तसे घडत नाही. महापालिका प्रशासनही शहरात सर्वत्र बोकाळलेल्या या फलक संस्कृतीकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करीत आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कान आणि डोळे बंद केल्याने त्यांना ना काही ऐकू येत ना काही दिसते, अशी स्थिती आहे.
मखमलाबाद रस्त्यावरील कोसळलेली कमान हा महापालिकेच्या सुस्त अधिकाऱ्यांसाठी एक धडा म्हणावा लागेल. किमान त्यामुळे तरी अधिकाऱ्यांना जाग येवून शहरात कुठेच अनधिकृत फलक, कमानी उभ्या राहणार नाहीत, याची काळजी घेण्याची आवश्यकता नागरिकांकडून मांडली जात आहे.