नाशिक– नाशिकसह त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी वाहनतळांची सुविधा तयार करतानाच तेथे भाविकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्धतेसाठी नियोजन करून कामे तत्काळ सुरू करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात गुरुवारी कुंभमेळासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत जिल्हाधिकारी शर्मा यांनी मार्गदर्शन केले. मागील आठवड्यात कुंभमेळ्याच्या कामांविषयी नाशिक तसेच त्र्यंबकेश्वर येथील आखाड्यांचे महंत, पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली होती. या बैठकीत कुंभमेळा कामांसंदर्भात एक समिती स्थापन करुन त्यामध्ये आखाड्याच्या प्रतिनिधींचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली होती.. याशिवाय प्रशासकीय पातळीवर सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या कामांविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली होती. कुंभमेळ्याची कामे पावसाळा संपताच वेगाने करता येतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले होते. त्यानंतर गुरुवारी आढावा बैठक झाली.
बैठकीस जिल्हाधिकारी शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे (नाशिक), पवन दत्ता (इगतपुरी), सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, चंद्रकांत खांडवी आदी उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहनतळांसाठी आदर्श आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी. त्यासाठी आवश्यक भूसंपादनासाठी महसूल विभागाने परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. कुंभमेळ्यासाठी विविध विभागांना आवश्यक क्षेत्राची मोजणी प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी आवश्यक बस, त्यांची रंगसंगती, वाहनतळ यांची निश्चिती करावी. जेणेकरून भाविकांना इच्छितस्थळी जाणे सुलभ होईल.
पोलीस विभागाने कसबे सुकेणे, खेरवाडी, ओढा, घोटी, देवळाली कॅम्प, नाशिक रोड रेल्वे स्थानकांपासून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरकडे जाणारे रस्ते निश्चित करून या रस्त्यांवर वाहतूक आणि गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी आराखडा तयार करावा. नदीकिनारी घाट बांधण्याच्या कामास गती द्यावी. रेल्वे विभागाने त्यांना आवश्यक असणारी जागा, त्यासाठी लागणारी रक्कम याची माहिती द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी कुंभमेळ्यासाठी रेल्वे, पोलीस दल, सार्वजनिक बांधकाम, महानगरपालिकेमार्फत सुरू असलेली विकास कामे, नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे बांधण्यात येणाऱ्या घाटांच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी काही सूचना केल्या.