नाशिक – त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याचे नियोजन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कुंभमेळा प्राधिकरणात नाशिकसह त्र्यंबकेश्वर येथील आखाड्यांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी यांचा समावेश करुन वेगळी समिती स्थापन करण्यात यावी, यासह इतर काही मागण्या आखाडा प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या उपस्थितीत झालेल्या सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत केल्या.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या उपस्थितीत येथील भक्तीधाममध्ये झालेल्या बैठकीस अखिल भारतीय संत समितीचे महामंत्री जितेंद्रानंद सरस्वती, आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते भक्तीचरणदास महाराज, कैलास मठाचे महंत स्वामी संविदानंद सरस्वती, दिगंबर आखाड्याचे महंत रामकिशोरदास शास्त्री, तपोवनातील बडा लक्ष्मीनारायण मंदिराचे रामशरणदास महाराज, महंत माधवदास राठी, तुषार भोसले आदी उपस्थित होते.

बैठकीत आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर करण्यात येत असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. कुंभमेळ्यानिमित्त विविध विकास कामे हाती घेण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले. २२०० कोटीची रस्त्यांची रस्ते कुंभमेळ्यानिमित्त करण्यात येत आहेत. दीर्घ कालावधी लागणाऱ्या कामांची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. महापालिकेच्या वतीने कुंभमेळ्यानिमित्त कुठल्या जागा ताब्यात घेण्यात येतील, याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

वेगवेगळ्या पातळीवर कोणती कामे सुरु आहेत, याची माहिती देतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी आखाड्याचे पदाधिकारी, साधू, महंत यांना काही सूचना असतील तर त्यांचे स्वागत असल्याचे सांगितले. सर्व कामे वेळेत पूर्ण होतील, अशी दक्षता घेण्यात येईल. जिल्हा प्रशासन साधू- महंतांशी नियमितपणे संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात येतील. सूचनांची दखल घेऊन त्यावर आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. साधूग्रामसाठी आवश्यक भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. लवकरच त्र्यंबकेश्वर येथील साधू- महंतांशी संवाद साधण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी शर्मा यांनी नमूद केले.

यावेळी साधू-महंत यांनी काही सूचना केल्या. भक्तीचरणदास महाराज यांनी, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासकीय पातळीवर अधिग्रहित करण्यात येणाऱ्या जागेचे लवकरात लवकर अधिग्रहण करण्यात यावे, शासनाने नाशिकसह त्र्यंबकेश्वर येथील आखाड्यांमध्ये जाऊन त्या ठिकाणी कुठल्या सोयी सुविधा हव्यात, याविषयी संबंधिताशी चर्चा करावी, कुंभमेळ्याशी संबंधित कामांची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी, कुंभमेळ्यासाठी शासनाने तयार केलेल्या कुंभमेळा प्राधिकरणासह १३ आखाड्याचे प्रतिनिधी, स्थानिक आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधी यांचा सहभाग असणारी एक समिती स्थापन करावी, ही समिती सर्वांशी समन्वय ठेवत प्रशासनासमोर सूचना मांडत जाईल, असे सांगितले. या सूचनांवर पुढील दोन महिन्यात अंमलबजावणी करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. समितीला कामे कुठपर्यंत झाली, याची माहिती दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, यानंतर आखाडा मंत्री, अखिल भारतीय संत समिती पदाधिकारी यांनी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याबरोबर विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेत मागण्यांविषयी चर्चा केली.

कुंभमेळ्याशी संबंधित कामांना प्रशासनाकडून गती देण्यात आली आहे. वेगवगळ्या बैठका होत आहेत. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी संत, महंत, आखाडा परिषदेचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करुन त्यांचे म्हणणे जाणून घेतले. त्यांच्याकडून करण्यात आलेल्या सूचनांची प्रशासनाकडून दखल घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.