मालेगाव : नागरिकांना तात्काळ व सुलभरित्या तक्रार करता यावी म्हणून नाशिक जिल्हा ग्रामीण पोलिसांनी सुरू केलेल्या ‘रक्षक ए आय’ ही व्हाट्सअप चॅटबाॅट प्रणाली गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरत आहे. या प्रणालीच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींनुसार जिल्ह्यातील तीन प्रकरणांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यालयीन सुधारणांसाठी १५० दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम राबविण्याचे आवाहन केले होते. त्याला अनुसरून नागरिकांना सुविधा आणि तत्पर मदत उपलब्ध व्हावी यासाठी नाशिक जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या संकल्पनेतून गेल्या १ सप्टेंबर पासून रक्षक ए आय ही व्हाट्सअप चॅट बाॅट प्रणाली सुरू करण्यात आली आहे. नाशिकच्या के.के.वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा.धनंजय कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली सौरभ शिंदे, निरज बावा, ओम निकम श्रीनाथ कदम,यश वडनेरे यांनी ही प्रणाली विकसित करण्यासाठी परिश्रम घेतले.
मालेगाव तालुक्यातील कुकाणे येथील दिनेश पगारे यांचा भ्रमणध्वनी हरवला होता. यासंदर्भात त्यांनी ‘रक्षक ए आय’ या प्रणालीद्वारे तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी भ्रमणध्वनीचा शोध घेतला व पगारे यांना तो परत केला. कळवण तालुक्यातील पाळे येथे एका तरुणाने हातात तलवार घेतलेले स्वतःचे छायाचित्र समाज माध्यमाद्वारे प्रसारित करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता. या प्रणालीद्वारे नागरिकांनी त्याची गोपनीय माहिती दिली होती. त्या अनुषंगाने अभोणा पोलिसांनी तात्काळ कारवाई करून अविनाश जाधव या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. सटाणा तालुक्यातील दोन जणांचे व्हाट्सअप अकाउंट हॅक झाले होते. संबंधितांनी रक्षक ए आय या प्रणालीवर त्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी योग्य ती कारवाई करून हे दोन्ही अकाउंट पूवर्वत केले.
काय आहे रक्षक ए आय ?
रक्षक ए आय व्हाट्सअप चॅटबाॅटसाठी ग्रामीण पोलिसांकडून ७०६६१००११२ हा व्हाट्सअप क्रमांक देण्यात आला आहे. ही प्रणाली नागरिकांसाठी २४ तास उपलब्ध होत आहे. अवैध व्यवसाय, हरवलेल्या आणि सापडलेल्या व्यक्ती, महिलांवरील अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक शोषण यासह कायद्याच्या परिभाषेत येणाऱ्या सर्व प्रकारच्या गुन्ह्यांची माहिती देणे आणि तक्रार करण्याची सुविधा या प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात जाण्याऐवजी माहिती देणे आणि तक्रार करण्याची सोय,गोपनीयता अशी या प्रणालीची वैशिष्ट्ये आहेत. या प्रणालीमुळे आधी ऑनलाईन व त्यानंतर थेट पोलीस ठाण्यात तक्रार करता येते. त्यामुळे एखाद्या गुन्ह्याची माहिती मिळताच तात्काळ कारवाई करणे पोलिसांना सुलभ होते. दिलेला व्हाट्सअप नंबर सेव्ह करून हाय गेल्यावर नागरिकांना ही चॅटबाॅट सुविधा वापरता येते.