नाशिक : गणेशोत्सवाच्या ऐन धामधुमीत शहरात निष्क्रिय स्फोटकांचा साठा आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तीन गोणींमधील जिलेटीनचा मुदतबाह्य साठा हस्तगत केला असून तो धोकादायक नसल्याचे बॉम्बशोध पथकाकडून सांगण्यात आले. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात निष्काळजीपणे जिलेटीनच्या कांड्या फेकणाऱ्या अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेशोत्सवानिमित्त ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असताना भाभानगर येथील गायकवाड सभागृह परिसरात नंदिनी नदीकिनारी रविवारी दुपारी तीन गोणी आढळून आल्या. या गोणींमध्ये संशयास्पद कांड्या असल्याने स्थानिकांनी मुंबईनाका पोलिसांशी संपर्क साधला. वरिष्ठ निरीक्षक संतोष नरूटे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. गोणींमध्ये स्फोट घडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जिलेटीनच्या कांड्या असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथकाला बोलावले. या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाल्याने पोलिसांना काम करतांना गर्दीलाही आवरावे लागले. गोण्यांची श्वान आणि बॉम्ब शोध पथकाकडून तपासणी करण्यात आली असता प्रथमदर्शनी व्यावसायीक कामासाठी जिलेटीन कांड्यांचा वापर करण्यात आल्याचे तपासणीत उघड झाले.खोदकाम अथवा तत्सम कामात या साठ्याचा वापर करण्यात आला असून तो धोकादायक नसल्याचे बॉम्ब शोध पथकाकडून सांगण्यात आले. पोलिसांनी तीन गोणींमध्ये असलेल्या जिलेटीनच्या कांड्या हस्तगत केल्या आहेत. परिसरातील सीसीटीव्ही चित्रणांची तपासणी करण्यात आली असून संशयिताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्फोटके फेकणे गुन्हा

कुठलेही स्फोटके निष्काळजीपणे उघड्यावर फेकणे कायद्याने गुन्हा आहे. व्यावसायीक कामासाठी या साठ्याचा वापर करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज असून, संबधितांनी ते नष्ट करणे आवश्यक होते. अनावधानाने मोठा अनर्थ घडू शकतो. पथकांकडून परिसरातील सीसीटीव्हींच्या माध्यमातून जिलेटीन फेकणाऱ्यांचा शोध घेतला जात असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. संतोष नरूटे (वरिष्ठ निरीक्षक, मुंबईनाका पोलीस ठाणे)