नाशिक : अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणारा भोंदूबाबा आणि त्याच्या सहकाऱ्यांची सखोल चौकशी करुन पीडितेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी अंधश्रध्दा निर्मूलन समितीने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे केली आहे. पीडितेवरील अन्याय, तिचे लैंगिक शोषण याविषयी तिच्या वडिलांनी पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातपूर कॉलनीत सिद्धार्थ भाटे उर्फ सिद्धार्थ गुरु या बाबाचा दरबार भरतो. या ठिकाणी नाशिकरोड येथे आईबरोबर राहणारी अल्पवयीन मुलगी ही वैयक्तीक अडचणींवर उपाय शोधण्यासाठी गेल्या होत्या. भोंदुबाबाने मुलीच्या अंगात अघोरी शक्ती असल्याचे सांगितले. तिचे लग्न अघोरी शक्ती असलेल्या व्यक्तीबरोबर म्हणजे आपल्याशी लावून द्या. अन्य कुठल्याही व्यक्तीशी तिचे लग्न होऊ शकत नाही, असे त्याने धमकावले. भोंदुबाबाने मुलीचे लैंगिक शोषणही केले. याप्रकरणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि महाराष्ट्र राज्य महिला तक्रार निवारण केंद्राच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त कर्णिक यांची भेट घेत निवेदन दिले. आयुक्तांच्या सुचनेनुसार नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेचे आई-वडील वेगवेगळे राहतात. महिलेने नाशिकरोड येथील राहते घर बदलून पतीला त्याविषयी सांगितले नाही. मुलीचा भोंदुबाबाशी गुपचुप साखरपुडा केला. लग्नासाठी पतीकडे एक लाख रुपये मागितल्याने हा प्रकार उघड झाल्याचे पीडितेच्या वडिलांनी सांगितले. मुलीवर दबाव आणून तिला लग्नासाठी तयार करण्यात आले आहे. लग्नानंतर तिचा जीवही जाऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. अंनिसचे डॉ. गोराणे यांनी, भोंदूबाबा विरोधात अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषणासंबंधीच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती दिली. अघोरी शक्तीविषयी दावा करणे, हा जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा असल्याने पोलिसांनी तसाही गुन्हा दाखल करण्याची मागणी गोराणे यांनी केली. या संपूर्ण घटनेत पीडितेची आई आणि तिच्या माहेरील काही मंडळी सहभागी आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. नाशिकरोड येथील मुलीसह ओझर येथील एक महिलाही बाबाच्या जाळ्यात अडकली असल्याचे गोराणे यांनी म्हटले आहे.
अल्पवयीन मुलगी आणि तिची आई भोंदुबाबाच्या जाळ्यात समाजमाध्यमातील जाहिरातीमुळे अडकल्या. सिध्दार्थ गुरू नावाने त्याचे समाज माध्यमात खाते आहे. त्याचा कल्याण येथेही दरबार भरतो. पीडितेला सातपूर येथील दरबारात नेले असता तिच्या अंगात अघोरी शक्ती असल्याचे त्याने सांगितले. पीडितेसह तिच्या आईचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने त्यांच्या घरी जावून कवटीतून धूर काढण्यासारखे काही प्रयाेग केले. यामुळे पीडितेचा साखरपुडा त्याच्याशी करण्यात आला.