नाशिक – विधानसभा निवडणुकीवेळी महायुती सरकारने घोषणा करूनही कर्जमाफीचे आश्वासन न पाळल्याने आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून थकीत कर्जासाठी सक्तीने वसुली होत असल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी आपल्या घरांवर, शेतात काळे झेंडे लावले आहेत.

निफाड तालुक्यातून या आंदोलनास सुरुवात झाली आहे. थेरगाव, शिरसगाव, वडाळी भागातील शेतकऱ्यांनी सरकारच्या निषेधार्थ आपल्या शेतात आणि घरांवर काळे झेंडे लावले आहेत. ओझर येथे झालेल्या अधिवेशनात शेतकऱ्यांनी १० ठराव केले होते. त्यात शासन जोपर्यंत कर्जमाफी करत नाही, तोपर्यंत आपल्या शेतात व घरावर काळे झेंडे लावून निषेध नोंदविण्याचा समावेश होता. त्यानुसार ठरावाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. जयराम मोरे, सोमनाथ झाल्टे , गोरख जाधव , सोमनाथ सहाने आदी शेतकऱ्यांनी काळे झेंडे लावले आहेत. संपूर्ण जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांकडे कुठल्याही बँकेचे कर्ज असेल किंवा जिल्हा बँकेचे कर्ज असेल, त्यांनी आपल्या शेतात व घरावर काळे झेंडे लावून निषेध नोंदविण्याचे आवाहन शेतकरी समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे आणि मोतीराम पाटील यांनी केले आहे.

थकीत कर्जामुळे नाशिक जिल्हा बँकेवर कारवाईची टांगती तलवार आहे. थकबाकी वसुलीसाठी बँकेने गेल्या ऑगस्टमध्ये नवीन सामोपचार कर्ज फरतफेड योजना लागू केली. बँकेचे ५६ हजार ७०० थकबाकीदार सभासद आहेत. त्यांच्याकडे २३०० कोटी रुपये थकबाकी आहे. यातील जून २०२२ पूर्वीचे ४५ हजार थकबाकीदार असून ते नव्या कर्ज परतफेड योजनेत सहभागी होण्यास पात्र आहेत. या योजनेत थकबाकीदारांनी सहभागी व्हावे, यासाठी बँकेकडून प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे थकबाकीदार शेतकरी सरकारी दरबारी व्याज व कर्जमाफीची मागणी करीत आहेत. थकबाकीदारांनी कर्ज व व्याजाची परतफेड करावी. जेणेकरून बँकेकडून आकारले जाणारे व्याज वाचणार आहे. सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यास ही रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात हस्तांतरणाची तयारी बँकेने दर्शविली आहे.

नाशिक जिल्हा बँकेच्या सामोपचार कर्ज परतफेड योजनेला विरोध दर्शवत शेतकरी समन्वय समितीने तालुकानिहाय बैठका घेतल्या. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या मुद्दलाच्या दुप्पट रक्कम होणार असून ती परवडणारी नसल्याचा आक्षेप भगवान बोराडे यांनी घेतला आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी आणि शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करावा, या मागणीसाठी शेतकरी समन्वय समितीने प्रदीर्घ काळ आंदोलन केले होते. कर्जमाफीच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी कर्जदार शेतकरी आता शेतात व घरांवर काळे झेंडे फडकावत आहेत.