नाशिक – जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला असून काढणीवर आलेला कांदा, सोयाबीन, मका, टोमॅटो, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी द्राक्षबागा आणि कांद्याच्या शेतात पाणी साचून राहिले. उन्हाळ कांद्यासाठी तयार केलेल्या रोपांचे नुकसान झाल्यामुळे उत्पादकांसमोर दुहेरी संकट उभे ठाकले आहे. दुसरीकडे सातत्याने होणाऱ्या पावसाने छाटणीनंतर अनेक ठिकाणी द्राक्षांची काडी तयार न झाल्यामुळे उत्पादकही अडचणीत आला आहे.
सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी आणि पूरामुळे नाशिक जिल्ह्यात दोन लाख ८८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. पावसाळा संपल्यानंतरही अधूनमधून पाऊस येत असल्याने नुकसानीचे सत्र कायम आहे. मागील महिन्यात नैसर्गिक संकटातून वाचलेली पिके आता अवकाळीच्या तडाख्यात सापडल्याचे चित्र आहे. सलग दोन दिवसांपासून सटाणा, देवळा, निफाड, दिंडोरी, चांदवड, सिन्नर, मालेगाव, मनमाड, विंचूर, सय्यदपिंप्री आदी भागात जोरदार अवकाळी पाऊस कोसळत आहे. काही भागात तो रात्रभर सुरू होता.
नाशिक शहरात शनिवारी रात्रभर तसेच रविवारी दुपारी शहरासह ग्रामीण भागात एक ते दीड तास पुन्हा मुसळधार पाऊस झाला. अवकाळीमुळे मका, सोयाबीन, काढणीवर आलेला कांदा आणि उन्हाळ कांदा रोपे आदींचे नुकसान झाले. दिंडोरी तालुक्यात द्राक्ष, टोमॅटो, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. देवळा, सटाणा, निफाड आदी भागातील काही गावांमध्ये शेतांमध्ये पाणीच पाणी झाले. पावसाळ्यात लागवड केलेला लाल कांदा काढणीवर येत आहे. पुढील काही दिवसात तो बाजारात विक्रीसाठी जाणार होता. हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून नेला.
अवकाळीने नाशिक तालुक्यातील सय्यदपिंप्री येथील गणेश ढिकले यांच्या द्राक्षबागेत पाणी साचले. हंगामात सातत्याने पाऊस झाला. बागेची छाटणी झाल्यापासून पावसाळी स्थिती बदलली नाही. सूर्यप्रकाश नव्हता.औषध फवारणी करूनही फळांची गर्भधारणा झाली नाही. द्राक्षांची काडीच न बनल्याने अनेक भागात द्राक्ष उत्पादक अडचणीत आल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी मुसळधार स्वरुपातील अवकाळी पाऊस कांद्यालाही नुकसानकारक ठरल्याचे नमूद केले.
ज्यांची हलकी जमीन आहे, त्याचे फारसे नुकसान नाही, परंतु, काळीभोर जमीन असणाऱ्यांना फटका बसेल. ज्या कांद्याची लागवड होऊन एक ते सव्वा दोन महिन्यांचा कालावधी झाला आहे, त्यांचे फारसे नुकसान होणार नाही. परंतु, ज्यांचा कांदा काढणीवर आला आहे, त्यांचे नुकसान होणार आहे. चालू वर्षात कांद्याला भाव मिळाले नाहीत. या स्थितीत उन्हाळ कांदा लागवडीसाठी उत्पादकांनी २५०० ते २६०० रुपये किलो दराने महागडी बियाणे खरेदी करून रोपे तयार केली. ही रोपे नाजूक असतात. अवकाळीत त्यांचे नुकसान झाल्यामुळे अशा शेतकऱ्यांना मोठी झळ बसणार असल्याचे दिघोळे यांनी सांगितले.
