नाशिक : सहा दशकात तब्बल ९०० हून अधिक लढाऊ विमानांची निर्मिती आणि जवळपास दोन हजार विमानांची देखभाल-दुरुस्ती (ओव्हरऑल) करणाऱ्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या येथील प्रकल्पात स्वदेशी हलक्या ‘तेजस एमके – १ ए’ या लढाऊ विमानाच्या निर्मितीला गती मिळाली आहे. तेजस उत्पादनासाठी दोन उत्पादन साखळ्या बंगळुरू येथे आहेत. नाशिक प्रकल्पातील ही तिसरी साखळी आहे. भारतीय हवाई दलाचा ताफा सदैव युद्धसज्ज राखण्यात हा प्रकल्प मोलाची कामगिरी बजावत आहे.
एचएएलच्या स्थानिक सुविधेतून निर्मिलेल्या पहिल्या तेजस एमके-१ ए या लढाऊ विमानाचे उड्डाण शुक्रवारी सकाळी अकरा वाजता संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. एचएएल प्रकल्पातील ’तेजस –एमके- १ ए‘ची तिसरी उत्पादन साखळी आणि एचटीटी-४० या प्रशिक्षणार्थी विमानाच्या दुसऱ्या उत्पादन साखळीचे उद्घाटन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होईल. या प्रकल्पात आधी जवळपास ३०० सुखोई विमानांची बांधणी झाली होती, तेव्हा निर्धारित वेळापत्रकाआधीच काम पूर्णत्वास नेल्याचा इतिहास आहे. लढाऊ विमानांचा असमतोल दूर करण्यासाठी एचएएलने ‘तेजस एमके – १ ए’चे उत्पादन त्याच वेगात करावे, अशी हवाई दलाची अपेक्षा आहे.
तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकारातून १९६४ मध्ये एचएएलच्या नाशिक प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. या प्रकल्पात विमान निर्मिती आणि दुरुस्ती असे स्वतंत्र विभाग आहेत. या प्रकल्पात आजवर मिग-२१ एम, मिग-२१ बीआयएस, मिग-२७ एम आणि अत्याधुनिक सुखोई-३० एमकेआय या विमानांची निर्मिती झाली. मिग मालिकेतील विमानांची संपूर्ण देखभाल-दुरुस्ती करण्यात आली. रशियाच्या मदतीने मिग – २१ बीआयएस मालिकेतील विमाने आणि स्वदेशी बनावटीच्या मिग २७ विमानांचे अद्ययावतीकरणही करण्यात आले. पावणेदोन लाख चौरस मीटर क्षेत्रातील विभाग अत्याधुनिक यंत्रसामग्री, उपकरणे व पायाभूत सुविधांनी सुसज्ज आहे. रचना, विकास, विमानांचे उत्पादन व दुरुस्ती, सुट्टे भाग अशा सर्व विभागात सुमारे साडेतीन हजार तंत्रज्ञ, अधिकारी, अभियंते व कुशल मनुष्यबळ आहे.
सध्या या प्रकल्पात सुखोई ताफ्यासाठी सुट्या भागांचे उत्पादन, लँडिंग गिअरची दुरुस्ती व पुरवठा, लढाऊ विमानांचा आर्युमान विस्तार, एएन-३२ साठी रबर इंधन टाक्यांचे स्वदेशीकरण, क्षेपणास्त्र लाँचर बिमची दुरुस्ती, सुखोईची देखभाल दुरुस्ती आणि अलीकडे ‘तेजस एमके – १ ए लढाऊ आणि एचटीटी-४० या प्रशिक्षणार्थी विमानाचे उत्पादन सुरू झाले आहे. हवाई दलाच्या तळांवर दुरुस्ती सहाय्यक पथकांची प्रतिनियुक्ती केली जाते. नौदलाच्या मिग – २९ ताफ्याला देखभाल सहाय्य केले जाते. या प्रकल्पातून व्हिएतनाम, मलेशिया, पेरू, म्यानमार आणि रोमानियाला मिग विमानांचे सुट्टे भाग निर्यात केले जातात. सहा दशकांतील कौशल्याने एचएएल नाशिकने जागतिक बाजारपेठेत आपली नाममुद्रा उमटवली आहे.