नाशिक : तहसीलदार पदावर नियुक्ती करण्याच्या नावाखाली संशयितांनी एका तरुणाला १२ लाख रुपयांना फसविले. याबाबत अक्षय झंवर (ढिकलेनगर, पंचवटी) या युवकाने तक्रार दिली.
अतुल पेठकर, वजीर मुजावर आणि सोनाली अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. जानेवारी २०२४ मध्ये झंवर यांची संशयितांशी भेट झाली होती. शासन दरबारी मोठ्या ओळखी असल्याचे भासवत संशयितांनी झंवर यांना थेट तहसीलदार पदावर नियुक्ती मिळवून देण्याची ग्वाही दिली. उच्चपदस्थ सरकारी नोकरीच्या मोबदल्यात लाखोंची मागणी करण्यात आली. त्यातील १२ लाख रुपये झंवर यांनी रोख आणि ऑनलाईन स्वरूपात दिले. अडीच वर्ष उलटूनही नोकरी लागली नाही. तसेच संशयितांनी पैसेही परत न केल्याने झंवर यानी पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टोळक्याच्या हल्ल्यात दोन जण जखमी
सिगारेटचे पैसे न देण्याच्या कारणावरून तिघांनी दोन मित्रांना बेदम मारहाण केली. यावेळी चाकुने हल्ला करण्यात आल्याने ते जखमी झाले. काझीगढी भागात ही घटना घडली. याबाबत अनंता पाटील (२४, पंचवटी) या युवकाने तक्रार दिली. मयूर उर्फ मया घातके आणि अत्तार बादशाह शहा अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून त्यांचा बंटी नामक साथीदार फरार आहे. पाटील आणि ऋतिक डोंगरे (२२, काझीगढी) हे दोघे मित्र सायंकाळी अमरधाम गार्डनलगतच्या पान टपरीवर गेले होते. सिगारेट घेऊन दोघे मित्र टपरीजवळ उभे असतांना संशयित त्रिकूटाने त्यांना गाठले. सिगारेटचे पैसे देत नसल्याचा जाब विचारत संशयितांनी दोघा मित्रांना बेदम मारहाण केली. यावेळी एकाने धारदार चाकुने दोघांवर वार केले. या घटनेत पाटील आणि डोंगरे हे दोघे जखमी झाले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इमारतीवरून पडून मजुराचा मृत्यू
बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडल्याने ३१ वर्षीय परप्रांतीय मजुराचा मृत्यू झाला. जुना गंगापूर नाका भागातील चोपडा लॉन्स परिसरात ही घटना घडली. श्याम भगत (रा. विकास कॉलनी, सातपूर) असे मृत कामगाराचे नाव आहे. श्याम हा मजूर गुरूवारी दुपारी जनकल्याण रक्तपेढी परिसरात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर काम करीत असतांना अचानक पाय घसरल्याने सहाव्या मजल्यावरून जमिनीवर कोसळल्याने गंभीर जखमी झाला होता. इतरांनी त्यास तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.