नाशिक: कुंभमेळा तयारीच्या अनुषंगाने नाशिक दौऱ्यावर असणारे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाण पुलाखालील भागात रेखाटलेल्या चित्रांची पाहणी केली. यावेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वागत तसेच छायाचित्र काढण्यासाठी गर्दी केली. १५ मिनिटे हे ‘फोटोसेशन’ सुरू होते. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला.

रविवारपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक दौऱ्यावर होते. कुंभमेळा तयारीचा आढावा, साधू-महंतांसोबत बैठक आदी नियोजनासाठी कुंभमेळ्याची जबाबदारी सांभाळणारे गिरीश महाजन हे देखील नाशिकमध्ये होते. सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत महामार्गालगतच्या वडाळा नाका भागात एका खासगी रुग्णालयाचे उद्घाटन झाले. या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री उड्डाण पुलाखालील भागात रेखाटलेल्या चित्रांची पाहणी करण्याचे नियोजन होते. परंतु, ऐनवेळी पाहणी रद्द करत ते पुढील कार्यक्रमासाठी मार्गस्थ झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मग, उड्डाण पुलाखालील चित्रांची पाहणी करण्यासाठी मंत्री महाजन तिथे पोहोचले. या ठिकाणी चित्र रेखाटणारा चित्रकार, भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते जमलेले होते. दुपारी दीड वाजता महाजन यांनी चित्रांची पाहणी केली. यावेळी भाजपचे स्थानिक कार्यकर्ते पुढे आले. अनेकांनी त्यांच्यासमवेत छायाचित्रे टिपली. यामुळे उड्डाण पुलाखालील द्वारकाकडून मुंबई नाक्याकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक खोळंबली. स्वागत, सत्कार स्वीकारून महाजन यांचा ताफा मार्गस्थ झाल्यानंतर काही वेळाने या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले.