नाशिक – भारतीय हवाई दलातील लढाऊ विमानांचा असमतोल दूर करण्यासाठी निवृत्त होणाऱ्या बहुतांश विमानांची जागा स्वदेशी हलक्या तेजसला दिली जाणार आहे. ‘तेजस –एमके-१ ए’ लढाऊ विमानाच्या उत्पादनात जवळपास पावणेदोन वर्ष विलंब झाला. ही बाब हवाई दलाची चिंता वाढविणारी ठरली. वेळापत्रकानुसार तेजसची पूर्तता करावी, याकरिता हवाई दलास आग्रही भूमिका घ्यावी लागली.

एचएएलच्या नाशिक प्रकल्पातील सुविधेतून निर्मिलेल्या पहिल्या हलक्या तेजस एमके-१ ए या लढाऊ विमानाचे उड्डाण शुक्रवारी सकाळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या निमित्ताने बंगळुरू पाठोपाठ नाशिक प्रकल्पात तेजसच्या उत्पादनाची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. भारतीय हवाई दलास लढाऊ विमानांच्या एकूण ४२ तुकड्या मंजूर आहेत.

अलीकडेच मिग – २१ विमानाच्या दोन तुकड्या (स्क्वॉड्रन) निवृत्त झाल्यामुळे दलाची लढाऊ ताकद २९ सक्रिय लढाऊ विमान तुकड्यांवर आली. मंजूर संख्येच्या तुलनेत मागील सहा दशकातील तुकड्यांची ही सर्वात कमी संख्या मानली जाते. तेजस – एमके – १ एच्या पूर्ततेस फेब्रुवारी २०२४ पासून सुरुवात होणे अपेक्षित होते. त्यास विलंब झाल्यामुळे हवाई दल एका वेगळ्या टप्प्यावर आले आहे. मिग – २१ नंतर पुढील काळात मिग – २९, जॅग्वार आणि मिराज – २००० ही विमाने निवृत्तीच्या वाटेवर येतील. या स्थितीत उत्पादनातील कालापव्यय दलाच्या लढाऊ क्षमतेवर परिणाम करेल, अशी धास्ती हवाई दलासह तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली.

प्रारंभी हवाई दलाने एचएएलकडे ८३ तेजस –एमके- १ ए विमानांची मागणी नोंदवली आहे. तब्बल ४७ हजार कोटींचा हा करार आहे. हवाई दलाची निकड आणि परदेशातून तेजसमध्ये स्वारस्य दाखविल्याने उत्पादनास गती मिळणे अपेक्षित होते. परंतु, तसे झाले नाही. या विमानात सुमारे ७५ टक्के स्वदेशी सामग्री वापरली जाते. इंजिनसाठी अमेरिकेच्या जीई एरोस्पेसशी करार झाला. तंत्रज्ञान हस्तांतरणाद्वारे एफ ४०४ हे इंजिन स्थानिक पातळीवर तयार केले जाईल. इंजिनच्या पुरवठ्यास काही महिन्यांचा विलंब झाला.

एका अहवालानुसार २०२३-२४ वर्षात कंपनी वार्षिक १६ इंजिन देणार होती. मात्र आवश्यकतेनुसार त्याची पूर्तता न केल्यामुळे एचएएलची कोंडी झाली. याची झळ उत्पादनास बसली. मध्यंतरी एचएएलच्या कार्यपद्धतीवर हवाईदल प्रमुखांनी तीव्र रोष प्रगट केला होता. एचएएलने आता तेजस एमके – १ एची पहिली तुकडी पुढील तीन महिन्यात देण्याची योजना आखली आहे.