नाशिक – शहरासह ग्रामीण भागात शुक्रवारी दिवसभर संततधार सुरू असून घाटा माथा भागात पावसाचा जोर अधिक आहे. तुडुंब भरलेल्या गंगापूर, दारणासह १५ धरणांमधून विसर्ग होत आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे शनिवारी हवामान विभागाने काही भागात यलो तर, घाट माथा क्षेत्रात ऑरेंट अलर्ट दिला आहे. गोदावरी, दारणासह अनेक नद्या दुथडी भरून वहात असून गणेश भक्तांनी नदी क्षेत्रात खबरदारी घेण्याचे आवाहन यंत्रणांकडून करण्यात आले आहे.

मागील २४ तासात त्र्यंबकेश्वर, पेठ, इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. शुक्रवारी त्याने नाशिकसह इतर भागात दिवसभर हजेरी लावली. शहरासह इतरत्र सलग चार ते पाच तास संततधार सुरू होती. पावसामुळे खड्डेमय रस्त्यांची बिकट अवस्था झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्याने दारणासह काही धरणांच्या विसर्गात वाढ करावी लागली. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यातील लहान-मोठी २६ धरणे तुडुंब भरलेली आहेत. या धरणांमध्ये ९८ टक्के जलसाठा आहे. कुठल्याही धरणात पावसाचे नवीन पाणी साठविण्यास जागा नाही. त्यामुळे पाऊस झाला की, विसर्ग करण्याशिवाय गत्यंतर नसते. मागील कित्येक दिवसांपासू धरणांमधून सात्यत्याने विसर्ग करावा लागत आहे.

शुक्रवारी दारणा धरणातून ४६०० क्युसेक, गंगापूर २०३०, कश्यपी ३२०, वालदेवी १७४, आळंदी २४३, भावली ४८१, भाम ९३७, वाघाड ५४४, पालखेड ८५६, पुणेगाव ७५, ओझरखेड २४, नांदूरमध्यमेश्वर ९४६५, गौतमी गोदावरी २८८, मुकणे ३६३, करंजवण ५९६ क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. धरणातील विसर्ग आणि संततधार यामुळे बहुतांश नद्यांना पाणी आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी हवामान विभागाने काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. घाट माथ्यावरील भागात तर ऑरेंज अलर्ट दिलेला आहे.

जलाशयांमध्ये विसर्जनास प्रतिबंध

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील लहान-मोठी सर्वच धरणे तुडुंब आहेत. याशिवाय तलाव, बंधारे यांची वेगळी स्थिती नाही. गणेश विसर्जन करताना धरणांसह अशा जलाशय परिसरात अनेकदा दुर्घटना घडल्या आहेत. यावेळी सर्वच धरणे, तलाव तुडुंब भरलेले असल्याने दुर्घटना व जल प्रदूषण टाळण्यासाठी गणेश भक्तांनी अशा ठिकाणी विसर्जन करू नये, असे आवाहन मृद व जलसंधारण विभागाने केले आहे. जल संधारण योजनांतील पाणी हे प्रामख्याने गावे, शहरांसाठी तसेच धरणाच्या लाभक्षेत्रातील गावांसाठी पिण्यासह शेती सिंचनासाठी वापरले जाते. गणेशोत्सवाचा समारोप करताना जीवितहानीच्या घटना आणि जलप्रदूषण टाळण्यासाठी जलाशयांमध्ये गणेशमूर्ती व निर्माल्य विर्सजित करू नये, असे जलसंधारण अधिकारी ह. का. गिते यांनी सूचित केले आहे.