नाशिक – गोदावरी खोऱ्यातील समन्यायी पाणी वाटपावरून दुष्काळात नाशिक, अहिल्यानगर आणि मराठवाड्यातील संघर्ष नवीन नाही. मुबलक पावसाच्या काळात जायकवाडी तुडूंब भरले की, हा संघर्ष टळतो. यंदा अतिवृष्टीने सर्वत्र तडाखा दिला.

मराठवाड्यात भीषण पूर परिस्थितीमुळे गोदावरी काठावरील अनेक गावे उद्ध्वस्त झाली. अनेक शाळा पाण्यात बुडाल्याने मुलांचे वह्या-पुस्तके नष्ट झाली. या कठीण काळात नाशिक येथील सोशल नेटवर्किंग फोरमच्या (एसएनएफ) पुढाकारातून मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ववत करण्यात खारीचा वाटा उचलण्यात आला.

मागील काही वर्षात पाण्यावरून नाशिक-मराठवाड्यात अनेकदा संघर्ष झाला. दुष्काळी वर्षात नाशिकमधील धरणांमधून मराठवाड्यासाठी पाणी सोडले गेले. या वर्षी गोदा काठावरील संकटात मदतीसाठी गोदेचेच पाणी वाहिल्याचे समोर आले. मराठवाड्यातील भीषण पूरपरिस्थितीमुळे गोदावरीच्या काठावरील अनेक गावांचे जगणे उद्ध्वस्त झाले. हजारो घरात पाणी शिरले, कुटुंबांचे संसार वाहून गेले. अनेक शाळा पाण्यात बुडाल्याने मुलांचे वह्या-पुस्तके नष्ट झाली.

या कठीण काळात अनेक संस्थांनी अन्न व कपड्यांची मदत केली. मात्र मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान ही सुद्धा चिंतेची बाब होती. हे लक्षात घेत सोशल नेटवर्किंग फोरमने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एसएनएफने केलेल्या आवाहनास राज्यभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

या माध्यमातून जमा झालेल्या निधीतून छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील लाखेफळ, दादेगाव जुने आणि मायगाव येथील जिल्हा परिषद शाळांतील २०१ विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य देण्यात आले. एसएनएफचे संभाजीनगर समन्वयक ऊमेश सोनवणे यांनी वितरण व्यवस्थेचे काम पूर्ण केले. या मदतीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले असून त्यांचे शिक्षण पुन्हा जोमाने सुरू झाले, हीच आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. नाशिकही गोदावरीच्या काठी वसले आहे. गोदेचेच पाणी गोदाकाठावरील संकटात मदतीसाठी धावले ही सुखद बाब असल्याची भावना सोशल नेटवर्किंग फोरमचे संस्थापक प्रमोद गायकवाड यांनी व्यक्त केली.

या उपक्रमाची संकल्पना जीवन सोनवणे यांनी मांडली. त्यात अक्षदा आहेर, संभाजी देशमुख, कोमल काशीद, प्रमोद गायकवाड, प्रियांका गायकवाड, अरुणा जोशी, डॉ.समीर पवार, सतीश मुजुमदार, डॉ.चेतन पाटील, वैशाली सुतावणे, सौरब देशपांडे, प्रसाद देशमुख आदींनी मदत केल्याची माहिती फोरमने दिली आहे.