नाशिक – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध अभ्यास मंडळांवर यंदा नाशिक जिल्ह्याचा प्रभाव दिसून आला आहे. ६१ अभ्यास मंडळांवर जिल्ह्यातील ५८ तज्ज्ञ प्राध्यापकांना सदस्य म्हणून नामनिर्देशन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील बहुतांश महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था, तालुक्यांना यात प्रतिनिधित्व मिळालं असून महात्मा गांधी विद्या मंदिर आणि मराठा विद्या प्रसारक संस्थेला आजपर्यंतचे सर्वाधिक नामांकन मिळाले आहेत.

या बाबतची माहिती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सागर वैद्य यांनी दिली. अभ्यास मंडळ सदस्यत्वाचा हा कालावधी पाच वर्षांचा असून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांचे झालेले हे नामनिर्देशन महत्त्वाचे आहे. नवीन अभ्यासक्रम निर्मिती, त्या अभ्यासक्रमावर कार्यशाळांचे आयोजन, परीक्षक नियुक्ती, संशोधनाची धोरण निश्चिती, संदर्भ ग्रंथ निर्माण करणे आदी महत्त्वाची जबाबदारी अभ्यास मंडळ पार पाडत असते.

हेही वाचा – नाशिक : आदिवासी उद्योजकांना प्रक्रिया उद्योगांसाठी आर्थिक पाठबळ; शबरी महामंडळ कार्यक्रमात डॉ. विजयकुमार गावित

जिल्ह्यातील मराठा विद्या प्रसारक संस्थेतील सर्वाधिक १७, महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेतील १५, व्ही. एन. नाईक संस्थेतील पाच, गोखले शिक्षण संस्थेतील पाच, भोसला संस्थेतील तीन, जे.डी. बिटको तीन, चांदवड नेमिनाथ जैन संस्था कॅम्पस तीन तज्ज्ञ प्राध्यापकांना विविध विषयांतील अभ्यास मंडळांवर सदस्यत्व देण्यात आले आहे. या व्यतिरिक्त जे. ए. टी. मालेगाव, देवळा महाविद्यालय, येवला स्वामी मुक्तानंद महाविद्यालय, सिन्नरचे श्री विश्वेश्वरय्या संस्था, एमईटी नाशिक, नाशिकरोडस्थित महिला महाविद्यालय, एकलहरे येथील मातोश्री महाविद्यालय या संस्थांतील प्रत्येकी एका तज्ज्ञ प्राध्यापकांची वर्णी यंदा अभ्यास मंडळांवर लागली आहे.

हेही वाचा – राज ठाकरे यांचा नाशिक दौरा निश्चित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुलगुरू कारभारी काळे, प्र कुलगुरू प्रा. डॉ. संजय सोनवणे, कुलसचिव प्रा. डॉ. प्रफुल्ल पवार यांनी नामनिर्देशित सदस्यांचे अभिनंदन केले. विद्यापीठ विकास मंचचे समन्वयक आणि विद्यापीठाचे सल्लागार राजेश पांडे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र विखे पाटील, मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, एमजीव्हीचे डॉ. अपूर्व हिरे आदींच्या सहकार्यामुळे नाशिकला इतके नामनिर्देशन मिळाल्याचे वैद्य यांनी म्हटले आहे.