नाशिक – माकपचे माजी आमदार जे. पी. गावित यांनी पेसा भरतीसाठी आदिवासी विकास भवन कार्यालयात चार दिवसांपासून उपोषण सुरु केले असून सोमवारी त्यांनी २८ तारखेपर्यंत मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला.

पेसा भरतीसाठी राज्यातील सर्व आदिवासी पात्र उमेदवार नाशिकमध्ये येणार आहेत. त्यादिवशी आंदोलनाविषयी पुढील भूमिका घेणार आहोत. २८ तारखेपर्यंत पेसाअंतर्गत भरतीविषयी निर्णय न झाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दारीदेखील धडक देण्यात येईल, असे गावित यांनी सांगितले.
सोमवारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गावित यांची आंदोलनस्थळी भेट घेतली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आंबेडकर यांनी सरकारला अदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जाणीव नसल्याचा आरोप केला. नाशिकचे आदिवासी आयुक्तालय आंदोलनासाठी लक्ष्य करण्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयास लक्ष्य करण्याची सूचनाही त्यांनी केली. गावित यांनी आमच्याबरोबर तिसऱ्या आघाडीत यावे, असा प्रस्तावही त्यांनी ठेवला.

हेही वाचा – नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य धरणे तुडुंब; धरणसाठा ५३ टीएमसीवर,२० धरणांमधून विसर्ग

हेही वाचा – लाडकी बहीण योजनेसाठी पैसा कुठून आणला; प्रकाश आंबेडकर यांचा प्रश्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी रविवारी गावित यांची आंदोलनस्थळी भेट घेतली होती. आरक्षणांतर्गत निवडून आलेले २५ आमदार आणि खुल्या वर्गात निवडून आलेले दोन, अशा एकूण २७ आमदारांना दोन दिवसात आदिवासी विकास भवन कार्यालयात बोलवणार असल्याचे झिरवळ यांनी सांगितले. या भरतीसाठी आपण सर्व मिळून मुख्यमंत्र्यांना इकडेच बोलावू किंवा मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन त्यांच्याशी चर्चा करून हा विषय मार्गी लावू, असे आश्वासन झिरवळ यांनी गावित यांना दिले. पेसा कायदा आणि पेसा भरतीबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी प्रतिक्रिया गावित यांनी दिली आहे.