नाशिक – राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी हनी ट्रँप प्रकरणावर सरकारची कोंडी केली असतांना खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर हे पुणे येथील रेव्ह पार्टीत संशयित म्हणून पोलिसांच्या कारवाईत सापडले. सामाजिक-राजकीय पटलावरील या नाट्यमय घडामोडीत खेवलकर यांचा रेव्ह पार्टीतील सहभाग आणि दर्शवले जाणारे पुरावे पाहता भाजपच्यावतीने याचा निषेध करण्यासाठी खेवलकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केले.
शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी हनी ट्रॅप प्रकरणात अधिवेशन काळात सरकारची कोंडी केली होती. या दरम्यान, खडसे आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्यात आरोप प्रत्यारोपाचा कलगी तुरा रंगला. बनावट सिडीसह मालमत्ता अशा वेगवेगळ्या कारणांवरून हा वाद सुरू असतांना खडसे यांचे जावाई आणि महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलेकर हे पुणे येथील रेव्ह पार्टीत सहभागी झाल्याचे समोर आले. या पार्टीत अंमली पदार्थाचा वापर होता. खेवलकर यांच्या भ्रमणध्वनी मध्ये आक्षेपार्ह्य छायाचित्रे आणि चित्रफिती आढळल्याचा आरोप होत आहे.
हनी ट्रॅप प्रकरणात खडसे यांनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहता त्यांना कोंडीत पकडण्याची संधी खेवलकर यांच्यामुळे भाजपला मिळाली. भाजप महानगरच्या वतीने शुक्रवारी जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांच्या नेतृत्वाखाली खेवलकर यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारण्यात आले. खेवलकर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. आंदोलनावेळी प्रांजल खेवलकर विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी केदार यांच्या समवेत नाना शिलेदार, सुनील देसाई, अमित घुगे, रोहिणी नायडू, राहुल कुलकर्णी आदी उपस्थित होते.
यावेळी केदार यांनी सांगितले, खेवलकर यांचे कृत्य निंदणीय आहे. त्यांना अटक करून गुन्हेगारी स्वरूपाच्या या प्रकरणात एसआयटी मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. आंदोलना मुळे परिसरात काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला.
रेव्ह पार्टी प्रकरण काय ?
खेवलकर हे पुणे येथील रेव्ह पार्टीत काही तरूणींसोबत आढळले. त्या ठिकाणी अंमली पदार्थ , मद्य आढळल्याचे आरोप झाले. पोलिसांनी खेवलकर यांच्या भ्रमणध्वनीची तपासणी केली असता त्यामध्ये महिलांसोबत केलेले अश्लील संभाषण, आक्षेपार्ह्य चित्रफिती, अर्धनग्न अवस्थेतील काही छायाचित्र आढळले. हनी ट्रॅप प्रकरणात सरकारला धारेवर धरणाऱ्या खडसे यांनी जावई खेवलकर यांची पाठराखण केल्याने हा वाद चिघळला आहे.