नाशिक – आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये हजारो कोटींची कामे करण्यात येणार आहे. नाशिकमध्ये लहान-मोठे १६ हजार उद्योग आहेत. कुंभमेळ्याची कामे ‘मेक इन नाशिक’ झाल्यास स्थानिक उद्योगाच्या विकासाला गती मिळू शकेल, याकडे नाशिक इंडस्ट्रीज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) आणि लघु उद्योग भारतीने लक्ष वेधले.
कुंभमेळा प्राधिकरणतर्फे रविवारी पंचवटीतील पंडित पलुस्कर सभागृहात कुंभ मंथनचे आयोजन करण्यात आले होते. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमास आ. राहुल ढिकले, आ. मंगेश चव्हाण, प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनिषा खत्री आदी उपस्थित होते. यावेळी क्रेडाई, निमा, आयमा, महाराष्ट्र चेंबर, आयएमए, लघू उद्योग भारती, वाहतूकदार आदी संघटनांच्या प्रतिनिधींनी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विविध सूचना मांडल्या. निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी कुंभमेळ्यातून दीर्घकालीन उपयुक्त ठरतील, अशा पायाभूत सुविधांची उभारणी करता येईल. ही कामे स्थानिक उद्योगांना मिळाल्यास विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
क्रेडाईचे प्रमुख गौरव ठक्कर यांनी गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरुपी यंत्रणा उभारण्याची गरज मांडली. अमृत स्नानावेळी सर्व भाविक रामकुंडावर येऊ नयेत म्हणून धार्मिक अधिष्ठान लाभलेल्या व्यक्तींना सदिच्छा दूत (ब्रँड ॲम्बेसिडर) नेमून त्यांचे आवाहनात्मक संदेश प्रसारित करण्याचा पर्याय त्यांनी सुचवला. आयमाचे प्रमुख ललित बुब यांनी नाशिक विमानतळावर आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी इमिग्रेशन तपासणी केंद्र कार्यान्वित करणे, हवाई प्रवासासाठी सुविधा वाढविणे, द्वारका- नाशिक रोड रस्ता वाढविणे, समृध्दी महामार्गाला नाशिक शहरापासून संपर्क व्यवस्थेची मागणी त्यांनी केली. महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष संजय सोनवणे यांनी कुंभमेळ्यात नाशिकमध्ये हजारो कोटींची उलाढाल होईल, याकडे लक्ष वेधले. भाविकांची गर्दी लक्षात घेता शहरातील महत्वाच्या चौकात भुयारी मार्गांची आवश्यकता त्यांनी मांडली. लघु उद्योग भारतीच्या सुजाता बच्छाव यांनीही स्थानिक उद्योजकांना कुंभमेळ्याची कामे मिळावीत, अशी सूचना केली. भाविकांना मंदिरांची माहिती होण्यासाठी डिजिटल फलकांची उभारणी, पाण्यासाठी एटीएमची व्यवस्था आणि कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी, असे त्यांनी नमूद केले.
विविध सूचना
नाशिक- संभाजीनगर रस्त्यावर शिलापूरपर्यत सेवा रस्ताची उभारणी, स्वयंसेवक नोंदणीसाठी पोर्टल, द्वारका- नाशिकरोड रस्त्याचे विस्तारीकरण, मखमलाबाद परिसरात रद्द झालेल्या हरित क्षेत्रात धर्मशाळा बांधकामासाठी परवानगी, अंबड-सातपूर औद्योगिक वसाहतीत गटार योजना, रामकाल पथच्या धर्तीवर रामकुंड परिसरात पर्यटकांसाठी लाईट शो, नाशिक-पुणे रेल्वे संपर्क व्यवस्था, एटीएमच्या धर्तीवर पिण्याचे पाणी, नाशिक व्हॅली पर्यटन, वैद्यकीय क्षेत्रासाठी मदतवाहिनी, स्वयंसेवकांना जीवरक्षक प्रशिक्षण, जकात नाक्याच्या ठिकाणी ट्रक टर्मिनलची उभारणी, टोलनाक्यावर विविध भाषिक कक्ष, कुंभमेळ्यासाठी ॲप तयार करावे, प्रवासी वाहतुकीसाठी दुचाकीला परवानगी, आदी सूचना करण्यात आल्या.