नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिक जिल्ह्यातील सर्वच रेल्वे स्थानकांना महत्व येणार आहे. त्यादृष्टीने काही रेल्वे स्थानकांमध्ये अतिरिक्त सुविधा, कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. देशाच्या इतर भागातून रेल्वेव्दारेच कुंभमेळ्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर येतील. त्यामुळे येणारी भाविकांची गर्दी सामावू शकेल अशी रेल्वे स्थानकांमध्ये सुधारणा करणे आवश्यक झाले आहे. अशी स्थिती असताना महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील दादर रेल्वे स्थानक, नाशिक जिल्ह्यातील नाशिकरोड रेल्वे स्थानक, मनमाड रेल्वे स्थानक आणि येवला रेल्वे स्थानक या स्थानकांसंदर्भात नाशिक जिल्ह्यातून एक वेगळीच मागणी पुढे आली आहे. यासंदर्भात नाशिक जिल्ह्यातून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदनही पाठविण्यात आले आहे.

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर सध्या २०१७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने चर्चेत आहे. प्रशासकीय पातळीवर सर्व तयारींना वेग देण्यात आला आहे. साधू, महंतांना राहण्यासाठी जागा निश्चित करणे, जागा मालकांना देण्यात येणारा मोबदला, साधू आणि महंतांच्या सूचनांवर कार्यवाही, रस्ते, अशी वेगवेगळी कामे पावसाळा संपल्यानंतर त्वरीत सुरु करण्यात येतील. जिल्ह्याचे पालकमंत्री जाहीर झालेले नसले तरी कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन हे प्रत्येक व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. याशिवाय सत्ताधारी महायुतीतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हेही कुंभमेळ्याशी संबंधित कामांवर लक्ष देत आहेत. भुजबळ यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत कामांची प्रगतीही जाणून घेतली आहे.

एकिकडे, अशी धामधूम सुरु असताना येवला येथील मुक्ती महोत्सव समितीचे निमंत्रक, प्रवर्तक प्रा. शरद शेजवळ यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णाव यांच्याकडे वेगळीच मागणी केली आहे. यासंदर्भात दिलेल्या निवेदनात त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे ‘मुंबई इलाका दलित वर्ग परिषद’ झाली.

या परिषदेत डाॅ. आंबेडकर यांनी ऐतिहासीक घोषणा केली. मी कोणत्या धर्मात जन्मास यावे, हे माझ्या हातात नव्हते. पण कोणत्या धर्मात मरावे, हे मात्र माझ्या हातात आहे, असे म्हणत मानवतेच्या हक्क-अधिकारासह, धर्म स्वातंत्र्याची हाक दिली. बाबासाहेबानी ज्या ठिकाणी ही ऐतिहासिक मुक्तीची गर्जना केली ती भूमी “मुक्तीभूमी” म्हणून ओळखली जाते. त्यामुळे येवला येथील रेल्वे स्थानकास “मुक्तीभूमी” रेल्वे स्थानक असे नाव देण्यात यावे. तसेच १९३८ ते १९५१ या कालावधीत तत्कालीन कायदामंत्री डॉ.बाबासाहेब आंबेडकर मनमाड शहरात मानवमुक्तीच्या आंदोलनानिमित्ताने येत असत.

डॉ.आंबेडकर विद्यार्थी आश्रम वसतिगृहाची स्थापना, भूमिपूजन, अनावरण कार्यक्रमासह १९३८ मध्य्ये मुंबई इलाका युवक परिषद,अस्पृश्य महिला-सबलीकरण परिषद,दलित कामगार परिषद, १९४९ मध्ये मुंबई इमारत फंड सभा अशा कार्यक्रमांना उपस्थित राहून विद्यार्थी, महिला,कामगार यांना बाबासाहेबांनी प्रेरणा दिली. बाबासाहेबांच्या पार्थिवावर दादर (मुंबई) येथे अंत्यसंस्कार केले गेले. ते स्थान चैत्यभूमी म्हणून ओळखले जाते. जगभरातील मानवतावादी, आंबेडकरवादी जनतेच्या भावना लक्षात घेऊन.दादर (मुंबई) रेल्वे स्थानकाचे चैत्यभूमी, येवला रेल्वे स्थानकाचे मुक्तीभूमी आणि मनमाड रेल्वे स्थानकाचे प्रेरणाभूमी असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी मुक्ती महोत्सव समितीचे निमंत्रक,प्रवर्तक प्रा. शरद शेजवळ यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.