नाशिक : शहर परिसरात बिबट्याचा वावर दिवसागणिक वाढत आहे. दोन महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात दोन बालकांचा मृत्यू झाला आहे. बिबट्याचा शहरातील वाढता वावर आणि हल्ले चिंताजनक असतांना वनविभागही सतर्क झाला आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाच्या वतीने कर्मचारी आणि ड्रोनच्या मदतीने बिबट्याचा शोध घेतला जात आहे.
काही दिवसांपूर्वी आर्टिलरी सेंटर येथील जवानांच्या वसाहतीत राहणाऱ्या एका जवानाचा दोन वर्षाचा बालक श्रृतीक गंगाधरन याला बिबट्याने उचलून नेले होते. १८ तास शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह आर्टिलरी सेंटरच्या जंगलात आढळला होता. या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली. आर्टिलरी सेंटर परिसरात बिबट्यास जेरबंद करण्यासाठी ठी वनविभागाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. या घटनेनंतरही ठिकठिकाणी बिबट्या नजरेस पडत आहे.
आर्टिलरी सेंटर आणि नागरी क्षेत्राच्या सीमेवरील भागात बिबट्या दिसून आल्याने त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, नाशिक विभाग पथक, संगमनेर बचाव पथक, आर्टिलरी सेंटरचे अधिकारी आणि जवान अशा एकूण १८० जणांच्या पथकाने अत्यंत बारकाईने नियोजन करत काम सुरू ठेवले. परंतु, परिसरातील घनदाट झाडी, पडीक घरे, तसेच ठिकठिकाणी तुटलेले कुंपण याचा फायदा घेत बिबट्या निसटून गेला. दरम्यान, हे क्षेत्र नो फ्लाय असल्यामुळे थर्मल ड्रोनचा वापर करणे शक्य झाले नाही. बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणानुसार पिंजऱ्यांच्या जागा बदलण्यात आल्या. नव्याने तीन ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. याशिवाय बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहेत. दोन ठिकाणी बिबट्यास बेशुद्ध करून जेरबंद करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.