नाशिक – एक नोव्हेंबर रोजी मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. तत्पूर्वीच, विरोधी पक्षांनी विधानसभा निवडणुकीत मतदार यादीतील कथित घोळाबद्दल पुन्हा प्रशासनाकडे दाद मागण्यास सुरुवात केली आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघात एक लाख १२ हजार मतदारांचा घोळ झाल्याची तक्रार मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

मनसेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेण्यात आली. मतदार याद्यांमधील कथित घोळ आणि तफावतीबाबत निवेदन व पेन ड्राईव्हद्वारे माहिती देण्यात आली. विधानसभा निवडणुकीतील मतचोरी जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला काळीमा फासणारी असल्याकडे शिष्टमंडळाने लक्ष वेधले. या निकालानंतर निवडणूक आयोगाची कार्यपद्धती नागरिकांना संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारास हानी पोहोचवणारी असल्याचे समोर आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातील यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाला असून त्याबाबतचा पेन ड्राईव्ह जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आल्याचे शिष्टमंडळाने म्हटले आहे.

या एकाच मतदारसंघात एक लाख १२ हजार मतदारांचा घोळ व तफावत आढळते. एक लाख मतदारांचे पत्तेच आढळले नाहीत. पत्ते नसताना निवडणूक आयोगाने मतदारांची नोंदणी कशी केली, असा प्रश्न मनसेने केला. या मतदारांचे पत्ते शून्य पत्त्यावर आढळून आले. यामध्ये १२ हजार बनावट, दुबार मतदार होते. खोटे व अवैध पत्ते असलेले मतदार, एकाच पत्त्यावर अनेक मतदार, अवैध व छायाचित्र नसलेले मतदार मोठ्या प्रमाणात असून अर्ज क्रमांक पाच आणि सहाचा गैरवापर करून नोंदणी केलेले, परंतु वास्तव्यास नसलेले मतदार, महाराष्ट्राबाहेरील राज्यात वास्तव्यास असलेला मतदार मोठ्या प्रमाणात आढळून आल्याचे मनसेने म्हटले आहे. मतदार यादीत अनेक त्रुटी व तफावत असून बनावट मतदार वगळून मतदार यादी स्वच्छ करावी, अशी मागणी करण्यात आली.

निवडणूक आयोगाला निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडायची असेल तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या मतपत्रिकेवर घ्याव्यात. आधार कार्ड शासकीय योजना, आर्थिक, सामाजिक, व्यवहारात सक्तीचे असताना मतदान प्रक्रियेत ते संलग्न करावे, जुन्या मतदारांचे जिओ टॅगिंग आणि आधार कार्ड संलग्न करावे. बनावट नावांचा समावेश करताना त्यांचे कोणते रहिवासी व अन्य पुरावे घेतले गेले होते. याची सखोल चौकशी व्हावी. मतदार यादीत नाव नोंदणीची सदस्य प्रक्रिया करणाऱ्या सर्व संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे,शहर समन्वयक भाऊसाहेब निमसे, महिला आघाडीच्या उपाध्यक्ष सुजाता डेरे आदींनी केली.