मालेगाव : विहिरीचे काम करत असताना दोन परप्रांतीय मजुरांचा बुडून मृत्यू झाला. मालेगाव तालुक्यातील कुकाणे शिवारात ही घटना घडली. संबंधित ठेकेदाराकडून सुरक्षा उपाय योजनांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे दोघा मजुरांना जीव गमवावा लागल्याचा आरोप करण्यात येत आहे. पोटाची खळगी भरावी, या हेतूने विहीर खोदकाम व बांधकाम करण्यासाठी आलेल्या परप्रांतीय मजुरांच्या जिवाचे मोल किती नगण्य आहे, याची या घटनेच्या निमित्ताने प्रचिती आली.
बजरंगपुरी गोसावी (४५) आणि सवारीपुरी गोसावी (४५) असे मृत्युमुखी पडलेल्या मजुरांची नावे असून ते दोघेही राजस्थानातील टिकऱ्या (तालुका चोमू,जयपूर) येथील रहिवासी होते. कुकाणे शिवारात निवृत्ती देवरे यांचे शेत आहे. शेतात सुमारे ३५ फूट खोल विहीर आहे. विहिरीत माती पडू नये म्हणून देवरे यांनी विहिरीभोवती सिमेंट काँक्रीटच्या रिंगा टाकण्याचे काम राजस्थानमधील ठेकेदारास दिले होते. त्यानुसार या ठेकेदाराने आपल्याबरोबर तीन मजुरांना आणून मंगळवारपासून काम सुरू केले. कामाच्या पहिल्याच दिवशी दुर्घटना घडली. आणि त्यात दोघांचा बळी जाण्याचा प्रकार घडला.
रिंग टाकण्यासाठी दोन जण विहिरीच्या काठापासून दीड फूट रुंदीचे खोदकाम करीत होते. एक जण तेथील झाडे तोडत होता. स्वतः ठेकेदार या तिघांवर लक्ष ठेऊन होता. त्याचवेळी विहिरीच्या काठावरील मातीचा भाग अचानक कोसळल्यामुळे त्या ठिकाणी खोदकाम करणारा एक जण विहिरीत पडला. त्याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. खोदकाम करणाऱ्या दुसऱ्या मजुराला पोहता येत असल्याने पाण्यात पडलेल्या मजुराला वाचविण्यासाठी त्याने लगेचच विहिरीत उडी घेतली. परंतु, बुडणाऱ्या मजुराने त्याला घट्ट मिठी मारल्याने दोघेही बुडाले.
नंतर ठेकेदार आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी दोरखंड टाकून या दोघांना वाचविण्याचे प्रयत्न केले. परंतु, ते व्यर्थ ठरले. विहिरीला २५ फूट पाणी होते. अखेरीस मालेगाव येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. वडनेर खाकुर्डी पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्न केल्यानंतर दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात चिकित्सा करण्यात आल्यानंतर दोन्ही शव अंत्यसंस्कारासाठी राजस्थानात नेण्यात आले. या प्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष
विहिर खोदकाम वा बांधकाम करत असताना मजुरांच्या सुरक्षेसाठी उपायोजना करण्याकडे अनेकदा दुर्लक्ष होत असते. त्यामुळे दुर्घटनांमध्ये मजुरांच्या बळी जाण्याच्या वा जखमी होण्याच्या घटना बऱ्याचदा घडत असतात. कुकाणे येथील ताज्या प्रकरणात देखील त्याचीच पुनरावृत्ती झाल्याचे दिसून येत आहे. मोठी जोखीम असलेले अशा प्रकारचे विहिरीचे काम करीत असताना तेथे प्लास्टिकची जाळी लावणे, अंगात सुरक्षापट्टा वा दोरखंड अडकवून आजूबाजूच्या झाडाला बांधून घेणे,यासारखी दक्षता घेणे आवश्यक होते. परंतु, ठेकेदार व मजूर या दोन्ही घटकांकडून बेपर्वाई दाखवली गेल्यामुळे दोन जणांचा बळी जाण्याची घटना घडल्याचे निरीक्षण जाणकारांकडून नोंदविण्यात आले आहे.
…तर दुर्घटना टळली असती
मृत्युमुखी पडलेले मजूर हे नात्याने शालक व मेहुणे होते. विहिरीत पडलेल्या मेहुण्याला वाचविण्यासाठी शालकाने पाण्यात उडी मारली. त्यात या दोघांचा बळी गेला. शक्यतोवर पावसाळ्यात विहिरीचे काम केले जात नाही, परंतु हे काम कसे सुरू झाले, हा प्रश्न आहे. तसेच सुरक्षा उपाययोजना केल्या गेल्या असत्या तर दुर्घटना टळू शकली असती. – जगन क्षीरसागर,(पोलीस पाटील, वजिरखेडे, मालेगाव)