बँकेला ७१.५४ कोटी रुपये नफा
बँकेचा आर्थिक व्यवहार सुरळीत करण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती केली जाते. ही नियुक्ती रिझव्‍‌र्ह बँकेच्या निकषानुसार नसून न्यायालयाच्या निकालावर असते. नाशिक मर्चट्स सहकारी बँकेवर प्रशासकाची नियुक्ती होऊन तीन वर्षे झाली असली तरी ती आणखी दोन वर्ष राहू शकेल, अशी शक्यता बँकेचे प्रशासक जे. बी. भोरिया यांनी दिली. बँकेवर प्रशासक नियुक्त झाल्यानंतर सलग तिसऱ्या वर्षी बँकेला ७१.५४ कोटी रुपयांचा विक्रमी नफा झाल्याचेही त्यांनी सांगितले.
बँकेवर प्रशासक नियुक्त होऊन तीन वर्षांचा कालावधी झाला आहे. या काळात बँकेने सलग तीन वर्ष नफा कमावला. त्यामुळे बँकेने सेवकांना २३ ते ४० टक्के पगारवाढ आणि सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनंतर २० टक्के बोनस दिला आहे. बँकेकडे सद्यस्थितीत १४४८.२७ कोटी रुपयांच्या ठेवी असून ९३९.२९ कोटींचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. बँकेची गुंतवणूक ८४१.०८ कोटींची असून रिझव्‍‌र्ह फंड ३३७.९२ कोटी रुपयांचा आहे. तसेच या वर्षीच्या नफा वाटणीमधून सभासदांसाठी १५ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला आहे. या तरतुदीनंतर राखीव निधी व भांडवल पर्याप्ततेत ३०.५० कोटींनी वाढ होणार आहे. बँकेचा एकूण व्यवसाय २३८८ कोटींचा आहे. सभासद संख्या १,७७,५२१ वर पोहोचली असून भाग भांडवल ४८.६९ कोटी रुपये आहे. बँकेचे निव्वळ एनपीए प्रमाण शून्य टक्के असल्याचे भोरिया यांनी सांगितले.
सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून नाशिक डायलिसीस सपोर्ट फाऊंडेशनला सात लाख आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ११ लाख रुपयांची देणगी देण्यात आली. तसेच बँकेच्या सर्व शाखांमधून फाटक्या, मळकट, जुन्या चलनी नोटा बदलून देण्याबाबत अभियान सुरू आहे. काळानुरूप सर्व शाखांमध्ये अत्याधुनिक सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न असून नव्या योजनांपेक्षा ग्राहक समाधानी कसा राहील यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. ग्राहकांनी आपल्या अडचणींविषयी थेट संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.