नाशिक – शहरातील रस्त्यांवर आजही खड्डे असून त्यामुळे अपघात होत आहेत. खड्ड्यांविषयी सातत्याने तक्रारी होत असल्याने महानगरपालिकेची बदनामी होत आहे. या पार्श्वभूमीवर, विभागस्तरावरील अभियंत्यांनी आपापल्या भागात पाहणी करून खड्डे बुजविण्याची तातडीने कार्यवाही करावी आणि या विषयीचा दैनंदिन अहवाल सादर करावा, असे निर्देश मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी दिले.

हेही वाचा >>> संत कबीरनगर झोपडपट्टीविरोधात जनहित याचिका

शहरातील खड्ड्यांचा विषय पावसाळ्यापासून गाजत आहे. या संदर्भात न्यायालयात याचिकाही दाखल आहे. पावसाळा संपुष्टात आल्यानंतर महापालिकेने काहीअंशी खड्डे बुजविण्याचे काम केले. मात्र आजही अनेक रस्त्यांवर खड्डे आहेत. खड्ड्यांवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी अनेकदा आंदोलने केली होती. रस्त्यांवरील खड्डे, वारंवार तक्रारी होणे, ही अतिशय गंभीर बाब असल्याचे आयुक्त खत्री यांनी सूचित केले. मनपाच्या विभागस्तरीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंते, उपअभियंते, विभागीय अधिकारी यांनी दररोज आपल्या भागात फिरून खड्ड्यांची पाहणी करावी आणि ते बुजविण्याची तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विभागीय अधिकाऱ्यांनी संबंधितांच्या कामांवर नियंत्रण ठेवावे. दररोज किती खड्डे बुजविण्यात आले, त्याची माहिती संबंधित विभागाकडे न चुकता सादर करावी. शहर अभियंत्यांना या कामावर देखरेख ठेवून खड्ड्यांची स्थिती व कार्यवाहीचा दैनंदिन अहवाल सादर करावा, असे बजावण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.