नाशिक – प्रयागराज कुंभमेळ्यात भाविकांची झालेली गर्दी लक्षात घेऊन नाशिकच्या कुंभमेळ्यात गोदा काठावर कोट्यवधी भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, रामकुंडावर भाविकांना कपडे बदलण्यासाठी वापरली जाणारी वस्त्रांतरगृहाची जुनाट, धोकादायक इमारत पाडण्याचे काम महापालिकेने सुरू केले.
गोदावरी पात्रात साधारणत ३४ वर्षांपासून वस्त्रांतरगृहाची इमारत उभी आहे. कुंभमेळ्यात ती धोकादायक ठरू शकते हे लक्षात घेऊन ती हटविण्याचे निश्चित करण्यात आले होते. गोदावरीत स्नान करणाऱ्या भाविकांना कपडे बदलण्याची व्यवस्था म्हणून तिची उभारणी झाली होती. मात्र प्रारंभीचा काही काळ वगळता देशभरातून येणाऱ्या भाविकांना तिचा तसा अपवादाने उपयोग वापर करता आला.
प्रदीर्घ काळ या इमारतीचा ताबा नाशिक पुरोहित संघाकडे होता. नाममात्र भाडेतत्वावर संघाकडून पूजाविधी व तत्सम उपक्रमांसाठी इमारतीचा वापर केला जात असे. याच ठिकाणी पुरोहित संघाचे कार्यालय होते. संबंधितांना पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्वासन देऊन अलीकडेच महापालिकेने ही इमारत ताब्यात घेतली.
कुंभमेळ्यात हजारो साधू-महंत रामकुंड तीर्थावर स्नान करतात. देशभरातून पूजाविधीसाठी वर्षभर भाविक या ठिकाणी येतात. आगामी कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविक नाशिकच्या कुंभमेळ्यात सहभागी होण्यााचा अंदाज वर्तविला जातो. रामकुंडावर सहजपणे ये-जा करण्यात वस्त्रांतरगृहाची इमारत एकप्रकारे अडसर ठरत होती. गोदावरी प्रदूषणाच्या संदर्भात दाखल याचिकेत नदी पात्रातील बांधकामांचा विषय समाविष्ट होता. उच्च न्यायालयाने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापलेल्या समितींच्या बैठकांमध्ये वस्त्रांतरगृहासह निळ्या पूररेषेतील बांधकामे हटविण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून सातत्याने केली जात होती.
रामकुंडावर प्रवेश करताना वस्त्रांतरगृहाची इमारत आहे. भाविकांना नदीकाठावर सहजपणे वावरण्यात ती अडसर ठरली होती. २०१५ मधील कुंभमेळ्यात वस्त्रांतरगृह हटविण्याचा विषय पुढे आला होता. मात्र, नंतर तो मागे पडला. स्मार्ट सिटी कंपनीने वस्त्रांतरगृह हटविण्याच्या विषयावर तीन संचालकांची समिती नेमली होती. त्यावर कार्यवाही झाली नाही. यावेळी अखेर तिला मुहूर्त लाभला.
मनपा आयुक्त मनिषा खत्री यांच्या निर्देशानंतर बांधकाम विभागाने शुक्रवारी रात्रीपासून इमारत पाडण्याचे काम हाती घेतले. पावसामुळे सध्या गोदावरी नदीला पाणी आहे. त्यामुळे प्रारंभी वस्त्रांतरगृहाच्या अंतर्गत भिंती हटविल्या जातील. पावसाने उघडीप घेतल्यानंतर पात्रातील पाणी पातळी कमी होईल. तेव्हा पाडकामास आणखी वेग येईल. असे मनपाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.