नाशिक – शहरातील गोदा पार्क, सिटी पार्क, बाळासाहेब ठाकरे उद्यान, कानिटकर उद्यान यांसह अन्य मोठ्या उद्यानांमधून महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याचे नियोजन करावे, असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी दिले आहेत. याआधी इंदिरानगरच्या सिटी गार्डनमध्ये शुल्क आकारणीचा प्रयत्न झाला होता. परंतु, नागरिकांच्या विरोधामुळे तो प्रत्यक्षात आला नाही. मनपाचे उत्पन्न वाढविण्यासाठी पुन्हा मोठ्या उद्यानांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
महापालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा आयुक्त खत्री यांनी घेतला. यावेळी मोठ्या उद्यानांच्या माध्यमातून मनपाचे उत्पन्न कसे वाढविता येईल, यावर विचारविनिमय करण्याचे सूचित करण्यात आले. याठिकाणी प्रवेश आणि तत्सम बाबींवर शुल्क आकारून मनपाचे उत्पन्न वाढविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. महापालिकेची शहरात लहान-मोठी ५०० हून अधिक उद्याने आहेत. त्यांच्या देखभाल व व्यवस्थापनावर मोठा निधी खर्च होतो.
महापालिकेने पहिल्या टप्प्यात रामवाडी येथे उभारलेल्या गोदा पार्क उद्यानासह पेलिकन पार्क, नाशिकरोड येथील सोमाणी आणि गंगापूर रस्त्यावरील स्व. बाळासाहेब ठाकरे अशी चार उद्याने खासगी संस्थेला व्यवस्थापन व चालविण्यासाठी देण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे सांगितले जाते. अन्य मोठ्या आणि गर्दी होणाऱ्या उद्यानांबाबत ती कार्यपद्धती अवलंबण्याचे प्रशासनाने ठरवले आहे.
याआधी इंदिरानगर येथील सिटी गार्डनला प्रवेश शुल्क लागू करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु, स्थानिकांच्या विरोधामुळे तो प्रत्यक्षात येऊ शकला नाही. मोठ्या उद्यानांमधून मनपाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याची सूचना वृक्ष प्राधिकरण विभागास करण्यात आली आहे.