नाशिक – आगामी महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रभाग रचनेवर प्राप्त झालेल्या सर्व ९१ हरकती व सूचना फेटाळत अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. म्हणजे यावेळी ही संपूर्ण प्रभाग रचना २०१७ मधील रचनेनुसार राहणार आहे. मागील निवडणुकीत ही रचना भाजपला फायदेशीर ठरली होती. अंतिम प्रभाग रचना आणि प्रभागनिहाय सीमांकनासह नकाशे प्रसिद्ध झाले असले तरी आरक्षण सोडतीवर इच्छुकांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे.

महानगरपालिकेत ३१ प्रभागात एकूण १२२ सदस्य असतील. यातील २९ प्रभाग चार सदस्यीय तर, १५ आणि १९ हे दोन प्रभाग तीन सदस्यीय राहणार आहेत. २०१७ मधील रचनेनुसार प्रभाग, सदस्य संख्या कायम आहे. प्रारूप प्रभाग रचनेवर ९१ हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या. यात काही भागांचे विभाजन झाले असून ते एका विशिष्ट प्रभागात समाविष्ट करावे, काही परिसर दुसऱ्या प्रभागात समाविष्ट करणे यासह अन्य हरकतींचा समावेश होता. पिंपळगाव खांब भागाचा परिसर प्रभाग २२ व ३१ अशा दोन ठिकाणी विभागला गेला आहे.

तो प्रभाग ३१ मध्ये कायम ठेवावा, अशी हरकत होती. प्रभाग २६ आणि २७ वरही हरकत घेण्यात आली होती. या हरकती व सूचनांवर मागील महिन्यात प्राधिकृत अधिकारी, पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांच्या उपस्थितीत सुनावणी झाली होती. प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या शिफारसी अंतभूर्त करून निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता दिली. अंतिम प्रभाग रचना नकाशावर सिमांकनासह प्रसिद्ध करण्यात आली.

अंतिम प्रभाग रचनेत फारसे कुठलेही बदल झालेले नाहीत. प्रभाग रचनेवरील ९१ हरकती फेटाळण्यात आल्याचे मनपातील सूत्रांनी सांगितले.आता प्रभागनिहाय मतदार याद्यांचे विभाजन आणि आरक्षण सोडत हे टप्पे पार पडतील.

आरक्षण कसे ?

यावेळी आरक्षण गतवेळप्रमाणे राहणार आहे. त्यात कुठलाही बदल झालेला नाही. खुल्या गटासाठी ६२, ओसीबी संवर्गासाठी ३३, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १८ आणि नऊ जागा अनुसूचीत जमातीसाठी आरक्षित असतील. एकूण जागांपैकी निम्म्या म्हणजे ६१ जागा महिलांसाठी राखीव राहणार आहेत. ओबीसी आरक्षण सोडत पद्धतीने काढले जाणार असल्याचे निवडणूक आयुक्तांनी आधीच म्हटले आहे. आरक्षण सोडतीवर इच्छुकांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.