नाशिक – हनी ट्रॅपमध्ये नाशिकचे नाव येणे हे दुर्देव आहे. नाशिकमध्ये अनेक गोष्टी घडत असतात. कधी रस्त्यांच्या स्थितीवरुन नाव खराब होते, तर कधी गुन्हेगारीमुळे. कुठे शेतकऱ्यांचे पैसे बुडविले जातात. असे व्हायला नको, पण होते, अशी खंत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
भुजबळ नाशिक दौऱ्यावर असतांना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हनी ट्रॅपविषयी माझ्याकडे माहिती नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्यात कुठेच हनी ट्रॅप नसल्याविषयी माहिती दिली आहे. त्यामुळे हा मुद्दा संपला आहे. स्वत: मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्यानंतर शंकेला वाव राहू नये, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री यांच्याकडे गृह खाते आहे. त्यामुळे चौकशी करूनच त्यांनी विधान केले असणार, असे भुजबळ यांनी सांगितले.
नाशिकचा उल्लेख कसा आला
राज्यातील ७२ उच्च आजी-माजी अधिकारी, राजकीय नेते आणि काही मंत्री यांना हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण विधिमंडळ अधिवेशनात गाजले होते. हनीट्रॅपचा उल्लेख करुन विरोधकांनी प्रामुख्याने काँग्रेसचे नाना पटोले, राष्ट्रवादीचे (शरद पवार) जयंत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणावरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात या प्रकरणात ठाण्यासह नाशिक शहराचा उल्लेख झाल्याने नाशिकमध्ये चांगलीच चर्चा रंगली. हनीट्रॅपच्या माध्यमातून काही गोपनीय माहिती आणि कागदपत्रे असामाजिक तत्वांच्या हाती जाण्याची भीती विरोधकांनी व्यक्त केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली. नाना पटोले यांनी तर या संदर्भातील पेनड्राईव्ह आपल्याकडे असल्याचा दावा केला होता. विधान परिषदेत अंबादास दानवे यांनी नाशिकसह ठाण्यात पोलिसांकडून याबाबत चौकशी झाली असल्याची माहिती असल्याचे नमूद केले. हनीट्रॅपमध्ये काही राजकीय लोकांचे नाव असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
विशेषत: राजकीय आणि शासकीय अधिकाऱ्यांमध्ये असा प्रकार खरोखर झाला असेल काय, इथपासून तर विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या आरोपात उल्लेख करण्यात येत असलेले हाॅटेल कोणते, याविषयी अंदाज लावले गेले.