नाशिक – वाढती लोकसंख्या आणि कमी होणारे मनुष्यबळ यांना तोंड देणाऱ्या नाशिक महापालिकेत स्थापत्य, यांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी सेवेतील ११४ सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंत्यांची तसेच आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन संवर्गातील चालक आणि फायरमनची १८६ अशी एकूण ३०० रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यात येणार आहेत.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, महापालिकेला तांत्रिक मनुष्यबळाची निकड होती. अपुऱ्या मनुष्यबळाचा कुंभमेळा कामांवर परिणाम होऊ नये म्हणून शासनाने गेल्या फेब्रुवारीत सरळसेवेने विविध विभागातील १४० अभियंत्यांची पदे भरण्यास मान्यता दिली होती. कुंभमेळा नियोजनाचे आव्हान पेलता यावे म्हणून या भरतीसाठी आस्थापना खर्चाच्या ३५ टक्के मर्यादेची अट शिथील करण्यात आली.

शहर विस्तारत असताना महापालिकेला मूलभूत सुविधा पुरविताना दमछाक होत आहे. महानगरपालिका आस्थापनेवर ७०८२ पदे मंजूर आहेत. यातील तीन हजारहून अधिक पदे रिक्त आहेत. आस्थापना खर्चाच्या निकषामुळे भरतीला मर्यादा आल्या होत्या. याचा कुंभमेळ्याच्या तयारीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने काही अटींवर विविध विभागातील अभियंत्यांच्या पद भरतीला मान्यता दिली.

महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अभियंता गट ‘क’मधील ११४ पदांसाठी तसेच गट ‘क’ आणि ‘ड’ मधील आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन संवर्गातील १८६ रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी १० नोव्हेंबर ते एक डिसेंबर २०२५ या कालावधीत अर्ज करता येईल.

अभियांत्रिकी सेवेतील सहायक अभियंता (विद्युत) तीन, सहायक अभियंता (स्थापत्य) १५, सहायक अभियंता (यांत्रिकी) चार, कनिष्ठ अभियंता (विद्युत) सात, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ४६, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) नऊ, कनिष्ठ अभियंता (वाहतूक) तीन, सहायक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) २४ आणि सहायक कनिष्ठ अभियंता (विद्युत) तीन पदे भरण्यात येणार आहेत.

आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन संवर्गातील अग्निशामक अर्थात फायरमनची १५० आणि चालक-यंत्रचालक, वाहनचालक (अग्निशमन) ३६ अशी एकूण पदे भरण्यात येणार आहेत. या प्रक्रियेत संवर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशील, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, वयोमर्यादा शिथिलता, निवड पद्धत, सर्वसाधारण सूचना, अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतूदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क आदी तपशील नाशिक महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.