नाशिक : ग्रामीण भागात नाफेडचे खरेदी केंद्र कुठे आहे, हे विचारल्यानंतर शेतकऱ्यांनाही सांगता येत नाही. पिंपळगाव बसवंतमधील केंद्र कुठे आहे, हे स्थानिकही सांगू शकत नाही. काहींकडून नाफेडच्या कार्यालयाचा पत्ता दिला जातो. बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद झाल्याच्या पार्श्वभूमिवर नाफेडने तातडीने कार्यान्वित केलेली कांदा खरेदी केंद्रे सापडता सापडत नसल्याचे चित्र आहे. कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद केल्यानंतर केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफ यांच्यामार्फत नव्याने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचे निश्चित केले. संबंधितांना तातडीने खरेदी सुरू करण्याचे निर्देश दिले.

नाफेडने क्षणाचाही विलंब न करता शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या फेडरेशनच्या सहाय्याने १० केंद्रे कार्यान्वित केली. पिंपळगाव येथील केंद्राचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते उद्घाटन होऊन कांदा खरेदीला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी १० केंद्रांवर २६९ मेट्रिक टन कांद्याची खरेदी करण्यात आल्याचे नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रितेश चौहान यांनी सांगितले. नाफेड खरेदीची आकडेवारी देत असली तरी या केंद्रांबाबत कांदा उत्पादक अनभिज्ञ आहेत. अनेकांना ही केंद्रे कुठे सुरू आहेत, ते माहिती नाही. कांदा खरेदी केंद्रांच्या ठिकाणांची स्पष्टता नाही. पिंपळगावमधील खरेदी केंद्राचा पत्ताही कुणाला सांगता येत नसल्याची स्थिती आहे.

हेही वाचा : कांदाकोंडी फुटली, आजपासून लिलाव; निर्यात प्रक्रियेतील कांद्याच्या सवलतीबाबत तोडग्याचे केंद्राचे आश्वासन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्यावेळी नाफेडने दीड लाख मेट्रिक टन कांदा सुमारे १५० केंद्रांमार्फत खरेदी केला होता. यावेळी एक लाख क्विंटल कांदा खरेदी करायचा असल्याने केंद्रांची संख्या वाढविली जाणार आहे. परंतु, ही केंद्रे शेतकऱ्यांना माहिती नसतील तर ते कांदा कसा नेणार? हा प्रश्न आहे. ही बाब उघड झाल्यानंतर त्यावर तोडगा काढण्याची तयारी दर्शविली गेली. शेतकऱ्यांचा जिथे अधिक संचार असतो, अशा ठिकाणी फलकाद्वारे खरेदी केंद्रांची माहिती देण्यात येईल. या फलकांवर केंद्रांची संख्या, पत्ता दिला जाईल, असे चौहान यांनी म्हटले आहे.