नाशिक – शहरात गुन्हेगारीचा आलेख उंचावण्यात राजकीय वरदहस्ताने विविध भागात निर्माण झालेल्या टोळ्या जशा कारणीभूत ठरल्या, तसेच अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारी कृत्यात वाढता सहभाग कारक ठरला. अनेक गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांत अल्पवयीन बालकांचा सहभाग निष्पन्न होत आहे.
गुन्हेगारी टोळ्यांवर धडक कारवाई करताना पोलीसांनी अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी आता थेट पालकांना इशारा दिला आहे. अल्पवयीन मुलगा किरकोळ गुन्हा जरी करताना आढळला तरी पालकांनीही चौकशीला तयार रहावे, असे सूचित केले आहे.
शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या समस्येकडे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी विविध माध्यमातून लक्ष वेधल्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हेगार कुठल्याही पक्षाचा असो, त्याच्याविरूद्ध कठोर कारवाईचे निर्देश दिल्यानंतर शहर पोलीसांकडून धडक कारवाईचे सत्र सुरू झाले. त्यात भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गटासह रिपाइंशी संबंधित माजी नगरसेवक, नेते पदाधिकार्यांसह त्यांच्या नातेवाईकांवर कारवाई केली जात आहे.
रिपाइंचा पदाधिकारी प्रकाश लोंढे आणि त्याच्या टोळीवर मकोकातंर्गत कारवाई करण्यात आली. राजकीय वरदहस्त लाभलेल्या टोळ्यांना वेसण घालताना पोलीसांकडून बाल गुन्हेगारीचे प्रस्थ रोखण्यासाठी समांतरपणे प्रयत्न केले जात आहेत. मागील काही वर्षात अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभाग वाढत आहे. हत्या, मारामारी, दहशत माजवणे, लूटमार यासारख्या गंभीर प्रकारात अल्पवयीन बालकांचा सहभाग वाढत असल्याचे दाखल गुन्ह्यांवरून लक्षात येते.
सप्टेंबर महिन्यात शिवाजीनगर भागात काही समाजकंटकांनी चारचाकी वाहनांच्या काचा फोडत, घरांवर दगडफेक करीत धुडगूस घातला. पोलीसांना बोलविले तरी ते आमचे काही करु शकत नाहीत, असे थेट आव्हान त्यांनी दिले होते. पोलीसांनी धाव घेत तीन संशयीतांना ताब्यात घेतले. ही मुले १६ -१७ वर्षाची होती. रात्री बारानंतर ती घराबाहेर पडली.
केवळ दहशत माजवण्यासाठी गाड्यांची तोडफोड, घरावर दगडफेक केल्याचे तपासात उघड झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन कारवाई करण्यात आली. अनेक गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग समोर येत आहे. अलीकडेच १४ व १५ वर्षांची तीन मुले रस्त्यावर गोंधळ घालताना आढळली. कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. परंतु, अशा अल्पवयीन मुलांच्या पालकांना आता शहर पोलीसांनी सूचक इशारा दिला आहे. पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना समज द्यावी.
शहराची बदनामी करणाऱ्या कृतीमध्ये त्यांचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि त्याचबरोबर पालकांनाही सह आरोपी करण्यात येईल, असे पोलीसांनी सूचित केले आहे. अल्पवयीन मुलगा किरकोळ गुन्हा करताना आढळला तरी पालकांनीही चौकशीला तयार रहावे, असे बजावण्यात आले आहे.
