नाशिक – महामार्गावर जबरीने भ्रमणध्वनी खेचून पळून जाणाऱ्या आंतरराज्य टोळीतील चोरटा जेरबंद करण्यात नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. त्याच्याकडून दोन भ्रमणध्वनी जप्त करण्यात आले.
दुचाकीवरून जाणारे तसेच वर्दळ कमी असलेल्या रस्त्यावरून, महामार्गावरून जाणाऱ्या पादचारी, वाहनचालकांना लक्ष्य करत जबरी चोरीचे प्रकार वाढले होते. वाहनांना धक्का देणे, चालकांचे लक्ष विचलित करण्यात येत होते. या लुटमारीच्या घटना पाहता पोलिसांसमोर चोरट्यांना शोधण्याचे आव्हान होते. वडनेर भैरव परिसरात एक दुचाकीस्वार पत्नीसह मालेगावकडे जात असतांना मुंबई-आग्रा महामार्गावर वडाळीभाेईजवळ दुचाकीने आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या हातातील पर्स बळजबरीने हिसकावली. याबाबत वडनेर भैरव पोलीस ठाण्यात तक्रार झाल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास स्थानिक पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात येत होता. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र मगर यांचे पथक या गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असताना प्रत्यक्षदर्शी आणि तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित हे मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील असल्याचे समजले. पोलिसांनी मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील साजीद खान (२० रा. खेरवा) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २३ हजार रुपयांचे दोन भ्रमणध्वनी जप्त केले. त्याचे अन्य साथीदार रिझवान खान (रा. खेरवा), अबु खान (रा. खलदा) हे फरार आहेत.
चोरी करण्याची पध्दत
साजीद आणि त्याचे मित्र रिझवान, अबु हे मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील रहिवासी आहेत. धार जिल्ह्यातील खेरवा जागीर हे गाव गुन्हेगारीसाठी प्रसिध्द आहे. हे तिघे गावातून दुचाकीने महाराष्ट्रात मुक्कामासाठी येत. चार ते पाच दिवसाच्या मुक्कामात दुचाकीने जात असतांना रस्त्यावरून जाणारा दुचाकीस्वार, पायी चालणारी व्यक्ती हेरायचे. त्याला जाणूनबुजून धक्का देत. त्याचे लक्ष विचलित करुन त्याकडील भ्रमणध्वनी, पर्स, पिशवी, अन्य मौल्यवान सामान लंपास करायचे. महामार्गावरून गाडी पुढे न्यायची आणि दुसरे सावज शोधायचे. कोणी गरजु दिसला तर हव्या त्या किंमतीत सामान विकून पैसे घेत. अथवा गावी आल्यावर सामान विकायचे. या पध्दतीने त्यांची लुटमार सुरू होती. ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेने खेरवा येथे जावून चोरट्याला जेरबंद केले.