नाशिक : आई, तुला त्रास द्यायचा नाही. माझा शैक्षणिक खर्च खूप आहे. तु ताण नको घेऊ. तुझी माझ्यामुळे धावपळ होते, असे चिट्ठीत नमूद करुन नाशिक पोलीस दलात अंमलदार असलेल्या महिला पोलीस कर्मचारीच्या मुलीने गळफास घेतला. ही मुलगी २० वर्षांची होती. तिने लिहिलेल्या चिठ्ठीने सर्वांना भावनाविवश केले.

पंचवटीतील विडी कामगार नगरात पूजा डांबरे राहत होती. ती नुकतीच बारावी परीक्षा उत्तीर्ण झाली होती. पुढील शिक्षणासाठी तिने महाविद्यालयात प्रवेशही घेतला होता. महाविद्यालयीन शिक्षण नियमितपणे सुरु झाले असताना पूजाने आत्महत्येचे पाऊल उचलल्याने नातेवाईकांसह सहकारी पोलीस कर्मचारीही हेलावले आहेत. वडील विभक्त राहत असल्याने कुटूंबात दोघी मायलेकी एकमेकांच्या साथीने एका छोट्याशा घरात राहत होत्या. आई नाशिक पोलीस दलात अंमलदार आहे.

आई-वडिलांच्या नात्यात निर्माण झालेली दरी, घरची बिकट आर्थिक परिस्थिती, यामुळे पूजा नैराश्यात होती. आईची तिच्या शिक्षणासाठी होणारी ओढाताण पाहून ती वैतागली होती. संवेदनशील पूजाने कौटुंबिक स्थितीनुरूप जुळते घेतले होते. परंतु, ती कायम तणावात राहत असे. आई पोलीस अंमलदार असल्याने त्यांना नोकरीसह घरचीही परिस्थिती सांभाळावी लागत होती.

पूजा ही आईवर जीवापाड प्रेम करत होती. आपल्यामुळे आईची होणारी तारांबळ नकोशी झाल्याने तिने गळफास घेतला. हा प्रकार अन्य लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी याबाबत आडगाव पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली.

नाशिक पोलीस दल कुटूंबातील दुसरी आत्महत्या

काही दिवसांपूर्वी नाशिकरोड परिसरातील उपनगर पोलीस ठाण्यातील हवालदार स्वप्नील गायकवाड (३५) यांनी कुटूंबातील ताणतणावाला कंटाळून आपल्या सात वर्षीय मुलगी भैरवी हिला गळफास देत आत्महत्या केली होती. या प्रकारानंतर पोलिसांवर असलेला कामाचा ताण, कामाच्या वेळा, कुटूंबातील सदस्यांशी हरवत चाललेला संवाद, आरोग्याच्या तक्रारी, असे सर्व मुद्दे चर्चेत आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी कायमच बोलले जात असले तरी, प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. त्यांच्यावरील मानसिक ताणाचे योग्य निराकरण होत नसल्याने त्यांच्याकडून, त्यांच्या घरातील सदस्यांकडून टोकाचे पाऊल उचलले जात आहे. पूजा डांबरे हिच्या आत्महत्येने पुन्हा एकदा पोलिसांवरील वाढत्या कामाचा विषय ऐरणीवर आला आहे. नाशिक पोलीस आयुक्त आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून आपल्या कर्मचाऱ्यांचे समूपदेशन करण्यात येणार आहे. पहिल्या टप्पात समूपदेशनावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.