नाशिक: रविवारी दुपारी पुन्हा एकदा मुसळधार पावसाने शहर आणि परिसराला झोडपले. जवळपास एक ते दीड तास पाऊस झाला. वेगवेगळ्या भागात सुमारे २५ हून अधिक झाडांची पडझड झाली. काही ठिकाणी रिक्षा, मोटारींवर झाडे कोसळली. सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीत अडथळे आले. अनेक भागातील वीज पुरवठा विस्कळीत झाला.
आठवडाभरापासून ग्रामीण भागासह शहरात मान्सूनपूर्व पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. शुक्रवारी रात्री पावसाने शहरात दाणादाण उडवली होती. रविवारी दुपारी पुन्हा काहीअंशी तशीच स्थिती निर्माण झाली. सकाळी सूर्यदर्शन झाले होते. दुपारी वातावरणात बदल होऊन मुसळधार पावसाला सुरुवात झाली. काही वेळात रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहू लागले. सुमारे दीड तास पावसाचा जोर कायम राहिला. या काळात अनेक भागात झाडांची पडझड झाली. सिटी सेंटर माॅलकडे जाणाऱ्या एबीबी चौकात रिक्षावर झाड कोसळले तर, सिडकोतील कोकण भवन परिसरात मोटारीवर झाड कोसळले. यात कोणी जखमी झाले नसल्याचे अग्निशमन दलाने म्हटले आहे.
संभाजी चौक, सावरकरनगर, सिडकोतील पाटीलनगर, उंटवाडी, शरणपूर रस्त्यावरील बारा बंगला, शरणपूर रस्ता गंगापूर पोलीस ठाण्यासमोर, समर्थनगर, कामटवाडा रोड, शरदचंद्र मार्केट यार्ड, साईआनंद अपार्टमेंट, हिरावाडी रोड, त्रिमूर्ती चौक, मोरे मळा, बुरकुले मळा, पाईपलाईन रोड, सातपूर कॉलनी, एक्स्लो पॉइंट अशा सुमारे २५ ठिकाणी झाडे पडल्याच्या तक्रारी आल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.
पाटीलनगर भागात अण्णासाहेब पाटील शाळेलगतच्या रस्त्यावर निलगिरीचे झाड कोसळले. अशा घटनांनी काही भागात वाहतुकीत अडथळे आले. पडलेली झाडे हटविण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. फांद्या आणि झाडे पडण्याच्या सत्राने वीज पुरवठ्यात अडथळे कायम राहिले. अनेक भागात दोन, तीन तास वीज पुरवठा खंडित झाला होता. सखल भागातील रस्त्यांना तळ्याचे स्वरुप आले, वाहनधारकांना या भागातून मार्गक्रमण करणे अवघड झाले होते.