नाशिक – शनिवार आणि रविवारी गोदावरीला आलेल्या पुराने नदीकाठच्या अनेक व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नदीपात्रातील आणि काठावरील मंदिरांमध्ये पाणी शिरले. काही साहित्य वाहून गेले. त्यातून सावरत व्यावसायिकांनी पुन्हा एकदा आपल्या कामाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली असताना सर्वाधिक नुकसान नाशिक आणि पंचवटी यांना जोडणाऱ्या सुमारे ७० वर्षे जुन्या रामसेतू पुलाचे झाले आहे. आगामी कुंभमेळावेळी येणाऱ्या भाविकांचा भार हा कमकुवत पूल पेलू शकणार नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळेच रामसेतू पुलासाठी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी एक वेगळी घोषणा केली आहे.

गोदावरीला आलेल्या पुरामुळे २०१६ नंतर प्रथमच रामसेतू पाण्याखाली गेला. पुरामुळे आधीच कमकुवत झालेल्या रामसेतूची अवस्था अधिकच वाईट झाले. पुलावरुन वाहने जाऊ नयेत म्हणून उभारलेले खांबांचे अडथळे उखडले गेले. पुलाच्या दुतर्फा असलेले लोखंडी कठडे वाकले, तुटले. पूल ठिकठिकाणी उखडला गेल्याने आणि काही ठिकाणचे कठडेही गायब झाल्याने पूल रहदारीसाठी धोकादायक झाला आहे. पूर ओसरल्यानंतर रामसेतूची झालेली अवस्था पाहून रामसेतूवरुन नियमितपणे ये-जा करणारे नाशिककर हळहळले.

याआधी २०२२ मध्ये गोदावरील्या आलेल्या पुरामुळे रामसेतू पुलाला तडे गेले होते. त्यावेळी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या संयुक्त पाहणीनंतर रामसेतू काही दिवस वापरासाठी बंद करण्यात आला होता. पुलावरुन दुचाकीसह लहान वाहनेही ये-चा करीत होती. परंतु, ही वाहतूक रोखण्यासाठी पुलाच्या नाशिककडील बाजूस आणि पंचवटीकडील बाजूस अडथळे उभारण्यात आले. पूल तोडण्याची तयारीही स्मार्ट सिटी कंपनीकडून करण्यात आली होती. नंतर पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला होता.

रामसेतू पूल आज मात्र शेवटच्या घटक मोजतांना दिसत आहे. गोदावरीला आलेल्या कित्येक पुरांचा रामसेतू हा साक्षीदार राहिला आहे. रामसेतूची निर्मिती १९५५ मध्ये झाली. तेव्हांपासून रामसेतूने काही महापुरांचे आणि अनेक पुरांचे आव्हान लिलया परतवून लावले. त्यात १९६९ आणि २००८ मध्ये आलेल्या महापुरांचा समावेश आहे. काही वर्षांपूर्वी रामसेतू पाडण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या.

शनिवार आणि रविवारच्या पुरानंतर गोदावरी काठावरील परिसर, भाजी बाजार पटांगण आणि रामकुंड परिसराची कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली. त्यानंतर रामसेतूची स्थिती पाहून त्यांनी तातडीने रामसेतू पाडून नवीन पूल बांधण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. तसेच रामसेतू आता पादचाऱ्यांसाठीही बंद करण्याची सूचना केली. नाशिककरांना आता नवीन रामसेतू आहे त्याच ठिकाणी बांधला जाणार की दुसऱ्या ठिकाणी याची उत्सुकता आहे.