नाशिक : राज्यभर पावसाचा कहर सुरू असताना नाशिकमध्ये मात्र तो अगदीच रिमझिम स्वरुपात अधुनमधून हजेरी लावत आहे. हंगामाच्या प्रारंभी दीड महिने जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला होता. नंतर तो अंतर्धान पावला. जवळपास महिनाभरात त्याचे प्रमाण तुरळक राहिले. दोन दिवसांपासून मराठवाडा, कोकण, विदर्भासह उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसाने थैमान घातले आहे. परंतु, नाशिक त्याच्या परिघाबाहेर राहिल्याचे दिसून येते.

हवामान विभागाने सोमवार व मंगळवारी नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज वर्तविला. परंतु, पहिल्या दिवशी ना वादळी वारा होता, ना दमदार पाऊस. काही काळ हलकासा शिडकावा झाला. दुसऱ्या दिवशी घाट माथा भागात ‘रेड अलर्ट’ जाहीर करण्यात आला. संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस कोसळत असताना नाशिकमध्ये मात्र त्याचा फारसा मागमूस नाही. २४ तासात शहर परिसरात १.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ग्रामीण भागात यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती. मंगळवारी सकाळपासून अनेक भागात ढगाळ वातावरण होते. परंतु, दुपारपर्यंत त्याचे अस्तित्व अधोरेखीत झाले नाही. बुधवारी काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

यंदा पावसाच्या हंगामाच्या आधीच मे महिन्यात १७०.७ मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची जिल्ह्यात नोंद झाली होती. हवामान विभागाकडील नोंदींचा विचार करता आजवरचा हा सर्वाधिक पाऊस ठरला. १५ पैकी सहा तालुक्यांत उन्हाळ्यात १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. जूनमध्येही पावसाचा जोर कायम राहिला. जवळपास दीड महिने तो सातत्याने कोसळला. हंगामाच्या प्रारंभीच्या कालखंडात असा पाऊस होण्याची ही मागील काही वर्षातील पहिलीच वेळ ठरली. मुसळधार पावसाने अनेकदा जनजीवन विस्कळीत झाले. लहान-मोठी बहुतांश धरणे तुडूंब भरण्याच्या स्थितीत पोहोचली. जुलैच्या मध्यावर त्याने काहीशी उघडीप घेतली. तेव्हापासून पावसाचा जोर ओसरलेला आहे. पावसाच्या आकडेवारीवरूनही ही बाब स्पष्ट होते.

सरासरीच्या तुलनेत ७५ टक्के पाऊस

एक जून ते १९ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात सरासरी ६४६.९ मिलीमीटर पाऊस होतो. परंतु, प्रत्यक्षात ४९०.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सरासरीच्या तुलनेत ७५.८ टक्के इतकाच पाऊस झाला आहे. महिनाभरात पावसाने विश्रांती घेतल्याचा हा परिणाम आहे. कारण, जुलैच्या मध्यापर्यंत जिल्ह्यात पूर्णपणे वेगळी स्थिती होती. एक जून ते १५ जुलै रोजी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत १०५. ८ टक्के पाऊस झाला होता. प्रशासनाच्या अहवालानुसार तेव्हा ३४२.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. मागील ३५ दिवसांत पावसाचा जोर ओसरल्याने सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी होऊन ७५ टक्क्यांवर आले आहे.