लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना महसूल विभागामार्फत सद्यस्थितीत विविध १३२ योजनांचा लाभ दिला जात आहे. या योजनांच्या अमलबजावणीसाठी नाशिक महसूल विभाग आघाडीवर आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे महसूल सप्ताहाचे उद्घाटन पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भुसे यांनी ही माहिती दिली. यापुढेही योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. भुसे यांनी लोकाभिमुख कामांचा निपटारा करण्यासाठी यावर्षी महसूल दिनापासून सात ऑगस्टपर्यंत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी बहुतांशी योजना ई प्रणालीच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. या प्रणालीमुळे वेळेसोबत इतर साधन सामुग्रीची बचत होत आहे. ई प्रणालीच्या वापरासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासन देखील नमो शेतकरी या योजनेच्या माध्यमातून वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट वर्ग करणार आहे. महिनाभरात या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांची नोंद ई प्रणाली द्वारे करण्यासाठी ही योजना कृषि विभाग, महसूल व ग्रामविकास विभाग यांनी संयुक्तपणे मोहिमस्तरावर राबवावी, असेही भुसे यांनी सूचित केले.
आणखी वाचा-समृध्दी महामार्गाच्या कामात घाई नाही – दादा भुसे यांचा दावा
महसूल विभाग हा राज्य शासनाचे नाक, कान व डोळे अशी महत्वाची भूमिका बजावित असल्याने सर्वांनी जनतेसाठी असणाऱ्या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी सहकार्याच्या भावनेतून काम करावे, असा सल्ला अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिला. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी महसूल दिनाच्या शुभेच्छा देतांना महसूल सप्ताह हा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले. आ. सीमा हिरे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमात नाशिक तहसील कार्यालयास एक व्हि.सी. यंत्रणा व संजय गांधी निराधार शाखेस संगणक संच देण्यात आला. जिल्ह्यात ई शिधापत्रिका देण्याचे सुनिश्चित झाले असल्याने मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात ई शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. तसेच जिल्हा नियोजन निधीतून जिल्ह्यातील १२ तहसील कार्यालयांसाठी वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.
आणखी वाचा-जिल्ह्यात डोळ्यांची साथ; बालकांमध्ये प्रमाण अधिक
विभागीय महसूल आयुक्त ई- कार्यालयात परावर्तीत
जनतेची कामे वेळेत होण्यासाठी प्रशासनात इ प्रणालीचा वापर करण्यात येत असून या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयात १०० टक्के इ कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर जिल्हाधिकारी कार्यालयात देखील इ कार्यालय सुरू करण्यात येत असून गतिमान प्रशासनाकडे टाकलेले हे पहिले पाऊल आहे, असे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले. तसेच विभागात इ प्रणालीच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात एक मदतकक्ष तयार करण्यात आला आहे. इ पंचनामे करतांना अतिवृष्टीबाबत येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन प्रत्येक मंडळात पर्जन्यमापक यंत्रणा लावण्यात आली आहे, या यंत्रणेच्या मदतीने पंचनाम्याची प्रक्रिया सोपी होणार आहे. यासोबत डिजिटल सातबारा, इ पीक पाहणी अशा विविध ऑनलाइन सेवांची गमे यांनी माहिती दिली.